अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जोपासत धावणारी, गोरगरीब-सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे पुन्हा संकटात सापडली आहे. ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ म्हणून हक्काने संबोधल्या जाणाऱ्या या ‘लाल परी’ची चाके पुन्हा थांबण्याच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. डिझेलचे गगनाला भिडलेले दर आणि प्रवाशांची कमालीची घटलेली संख्या या दोन कारणांमुळे एसटीला चांगलाच फटका बसत असून, उत्पन्नाचा स्रोतही कमालीचा घटला आहे. या संपूर्ण कारणांमुळे असंख्य एसटीच्या फेऱ्या दिवसागणिक बंद पडत आहेत.
उमरेड आगारातून ५० एसटी बस धावतात. यापैकी आजघडीला केवळ १५ बस सुरू आहेत. अन्य तब्बल ३५ गाड्यांची चाके थांबली आहेत. या कारणामुळे बहुतांश गावांतील नागरिकांची गैरसोय होत असून, एसटी बंद झाल्याने पुन्हा दळणवळणासह असंख्य दैनंदिन बाबींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उमरेड आगारातून १ मार्चपूर्वी एसटीच्या २२२ फेऱ्या होत असत. हल्ली केवळ ८३ फेऱ्यांवर समाधान मानावे लागत आहे. चक्क १३९ फेऱ्या बंद असल्याने प्रवासी वाहतुकीची घडी विस्कटली आहे. सध्या उमरेड येथून नागपूर, गडचिरोली, हिंगणघाट, आंभोरा, भिवापूर, पुसद, माहूर, वर्धा, अमरावती, बेला, यवतमाळ, हिंगणा, पचखेडी, अदिलाबाद आदी मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. यातही उत्पन्नात घट आल्यास या फेऱ्यासुद्धा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवासीच मिळत नाही आणि उत्पन्नही घटल्याने नाइलाजास्तव आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया उमरेडचे आगार व्यवस्थापक संजय डफरे यांनी व्यक्त केली.
मागील वर्षी कोरोनाकाळात चक्क सहा ते सात महिन्यांनंतर आता कुठे एसटी धावत होती. गाडी रुळावर येत असतानाच अचानक पुन्हा थांबल्यास चांगलेच संकट उभे ठाकणार आहे. शासनाने तातडीने योग्य नियोजन आखून राज्य परिवहन महामंडळास मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरत आहे.
....
‘त्या’ मार्गावर एसटी बंद
उमरेड आगारातील माहितीनुसार, २५ फेब्रुवारीपूर्वी एसटीच्या माध्यमातून प्रतिकिलोमीटर २३ ते २४ रुपये उत्पन्न मिळत होते. अचानक प्रवासी संख्येत घट झाल्यानंतर एसटीच्या उत्पन्नातही कमालीची घट झाली. दुसरीकडे खर्च वाढला. सध्या प्रतिकिलोमीटर १४ ते १८ रुपये उत्पन्न आगाराला मिळत आहे. डिझेलचीही रक्कम निघत नाही, अशी बिकट अवस्था महामंडळाची झाली आहे. ज्या एसटीचे उत्पन्न प्रतिकिलोमीटर २५ रुपयांपेक्षा कमी असेल, त्याठिकाणच्या एसटी फेऱ्या बंद कराव्या, असा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन चर्चेअंती हा निर्णय झाल्याची बाब समोर येत आहे.
...
गावखेड्यासह असंख्य मार्गावरील एसटी सेवा बंद केली जात आहे. आमच्या दररोजच्या दैनंदिनीचा मौलिक भाग एसटी आहे, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे. अशावेळी आम्ही लसीकरणासाठी केंद्रावर जायचे कसे, असाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.
- लक्ष्मण चौधरी, रा. सरांडी.