लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर करारानुसार दरवर्षी नागपुरात एक विधिमंडळ सत्र घेणे अनिवार्य आहे. नागपुरात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मार्गी लागतील यामुळे कालावधी वाढवावा अशी एरवी अपेक्षा असते. मात्र यंदा नेमकेउलटे चित्र आहे. ऑक्टोबरनंतर ‘कोरोना’चा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय जगताकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ७ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन नागपुरात आणखी समस्या निर्माण करणारे होऊ शकते. सरकारच्या सेवेत अर्धी वैद्यकीय यंत्रणा राबेल. अगोदर अपुरी वैद्यकीय सुविधा असताना अशा स्थितीत जनतेकडे लक्ष कोण देणार, हा कळीचा मुद्दा आहे. एकूणच स्थिती पाहता कराराचे पालन करणे महत्त्वाचे की नागरिकांचे आरोग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्री, आमदार यांच्या दिमतीला वैद्यकीय विभागातर्फे मेयो-मेडिकलचे विशेष पथक लावण्यात येईल. अगोदरच नागपुरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभावामुळे मनपाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत डिसेंबर महिन्यात तर त्यात आणखी वाढ होईल. अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच सचिवालयाचे नागपुरात काम सुरू होईल व त्यासाठी मुंबईतून कर्मचारी-अधिकारी शहरात येतील. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अपुऱ्या सुविधांचा सामना करत असलेल्या नागपूरसमोर यामुळे मोठे संकट उभे ठाकू शकते. त्यामुळेच यंदा अधिवेशन नागपुरात नको अशी जनसामान्यांचीदेखील भावना आहे.
कोविड सेंटर हातातून जाणार
आमदार निवासात स्थापन करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये १४ मार्चपासून नागरिक येत आहेत. अधिवेशनासाठी येणारे अनेक आमदार तेथे थांबत जरी नसले तर कागदावर तर त्यांना तेथील खोली देण्यात येते. त्यामुळे जनतेच्या हक्काचे व सोयीचे कोविड सेंटरदेखील बंद होणार आहे. रविभवनात कोरोना बाधितांच्या सेवेत असणारे डॉक्टर राहत आहेत. शिवाय तेथे ‘आरटीपीसीआर’ चाचणी केंद्रदेखील आहे. तेदेखील बंद करावे लागेल व डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होईल.
मोर्चे ठरू शकतात ‘कोरोना कॅरिअर’
हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर खरोखरच किती चर्चा होते व न्याय मिळतो हा संशोधनाचा विषय असला तरी मोर्चेकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. ‘कोरोना’ कालावधीत मोर्चांना परवानगी देण्यात येणार आहे. अशा स्थितीत गर्दीचे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर राहणार आहे. हे मोर्चेदेखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस नागपुरात येत असतात. अनेकदा त्यांना दाटीवाटीनेच रहावे लागते. एकूण सुविधा लक्षात घेता ‘कोरोना’ काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखणे हे पोलिसांसाठीदेखील मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषत: अनेक पोलिसांची व्यवस्था ही पोलीस लाईन टाकळी येथे करण्यात येते. अशात एखादा जरी पोलीस कोरोनाबाधित निघाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
मोर्चकऱ्यांनादेखील धोका
विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा काढणारे मोर्चेकरी हेदेखील राज्याच्या विविध भागांतून येतात. अनेकदा ते खचाखच भरलेल्या खासगी वाहनांतून येतात. मोर्चांमुळे सीताबर्डी, टेंपल बाजार मार्ग, सदर, यशवंत स्टेडियम या परिसरात गर्दी होते. डिसेंबरपर्यंत ‘कोरोना’ जाणे अशक्य असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. अशा स्थितीत मोर्चेकरी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळतात की नाही, ‘मास्क’ लावतात की नाही याकडे कुणाचेही लक्ष राहणार नाही. यामुळे मोर्चकऱ्यांदेखील संसर्गाचा धोका होऊ शकतो.