कुही : कुही तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यावेळी प्रस्थापितांना धक्के देण्यासाठी बहुतांश गावांत तरुणांनी दंड थोपटल्याचे चित्र आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये गावाचा विकास, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी या मुद्यावर जोर देऊन पॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. मांढळ जि.प.सर्कलमध्ये मोडणाऱ्या ११ सदस्यीय तारणा ग्रा.पं.मध्ये २५ उमेदवार रिंगणात आहेत. येथे दशकभरापासून भाजप समर्थित नथ्थू तळेकर गटाचे वर्चस्व आहे. विद्यमान उपसरपंच पराग तळेकर पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. या पॅनेलने बहुतांश जुन्याच चेहऱ्यांना संधी देत ११ ही जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेससमर्थित ग्रामविकास पॅनेलने कंबर कसली आहे. या पॅनेलने ११ ही जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. येथे पं.स. सदस्य संदीप खानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यातील पारडी गट ग्रा.पं.च्या नऊ जागेसाठी एका अपक्ष उमेदवारासह १८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे यापूर्वी शिवसेना-भाजपचे वर्चस्व होते. येथे तीन वॉर्ड असून दोन वाॅर्ड पारडी व एक वाॅर्ड पचखेडी येथील आहे. यापैकी पचखेडी येथील एक उमेदवार पिंटू बनकर हा अविरोध निवडून आला आहे. आता येथे दोन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांच्या मार्गदर्शनात विद्यमान सरपंच सुनील खवास,चंद्रशेखर भुजाडे आदींनी पारडी महाविकास आघाडी पॅनेल तयार केले आहे. या पॅनेलने आठही जागेवर उमेदवार उभे केले आहेत. येथे काँग्रेससमर्थित विरोधी गटाने ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून आठ जागी उमेदवार उभे केले आहेत. येथील वाॅर्ड नं. २ मध्ये प्रस्थापित उमेदवार पुरुषोत्तम पोटे यांची लढत नरेश शुक्ला यांच्यासोबत आहे. पोटे यापूर्वी तीनवेळा सदस्य राहिले आहेत. वाॅर्ड नं.२ मध्ये अनु.जाती राखीवमध्ये शैला कैलास खडसे या अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
तालुक्यातील वीरखंडी ग्रा.पं.मध्ये तीन प्रभागातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी पॅनेल तर त्यांच्या विरोधात भाजपसमर्थित युवा ग्रामविकास पॅनेल अशा दोन पॅनेलमधून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीने बहुतांश जुन्याच उमेदवारांनी संधी दिली आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान सरपंच माधुरी लोखंडे, अंजू लोखंडे, विजया चाफले, कांता माकडे, विनोद लोखंडे, सुरेश रेवतकर, परमेश्वर पडोळे यांना संधी देण्यात आली. त्यांच्या विरोधात युवा ग्राम विकास पॅनेलने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात अनिस लोखंडे, माधुरी मेश्राम, विक्रम रेवतकर, संध्या लोखंडे, संजय लेंडे, अनिता वासनिक, रेणुका पडोळे यांचा समावेश आहे.
-------
तारणा ग्रामपंचायत
एकूण वाॅर्ड -४
एकूण सदस्य - ११
एकूण उमेदवार - २५
एकूण मतदार - २८४५
पुरुष मतदार - १४७४
महिला मतदार - १३७१
-----
पारडी ग्रामपंचायत
एकूण वाॅर्ड - ३
एकूण सदस्य - ९ (१ अविरोध)
एकूण उमेदवार - १७
एकूण मतदार - १४०१
पुरुष मतदार - ७३०
महिला मतदार - ६७१
----
वीरखंडी ग्रामपंचायत
एकूण वाॅर्ड - ३
एकूण सदस्य - ७
एकूण मतदार - ६०९
पुरुष मतदार - ३०८
महिला मतदार - ३०१.
--------