विजय नागपुरे
कळमेश्वर : कोरोनाची लागण झाल्यास अनेकांना धडकी भरते. कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल पाहून अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. परंतु जगण्याची इच्छाशक्ती व लसीकरणामुळे या आजारावर मात करता येते, हे कळमेश्वर येथील तलाठी सूरज सादतकर यांनी दाखवून दिले.
कळमेश्वर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या बोरगाव (धुरखेडा) येथील तलाठी सूरज सादतकर हे दिलेले कार्य वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व. सध्या तालुक्यात शासनाकडून कोविड लसीकरणाबाबत मोहीम आखून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम जोमाने सुरू आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी दारोदारी फिरून नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात मोठ्या प्रमाणात यशही आले. मुळात शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सादतकर जोमाने कामी लागले. लसीकरणात आपल्या गावाचा उच्चांक व्हावा अशी इच्छा मनाशी बाळगून तलाठी सादतकर यांनी स्वत:च्या कारमधून नागरिकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण केली. आपणही दुसरा डोस घ्यावा म्हणून त्यांनी लस घेतली. थोडा ताप आला. दुसरा डोस घेतल्याने स्वत:वर दुर्लक्ष झाले व इथेच घात झाला. सादतकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. तब्येत जास्त बिघडली. नागपूरमध्ये बेड, रेमडेसिविर, ऑक्सिजनची मारामार असल्यामुळे आधी कळमेश्वर कोविड केंद्रावर गेले. तेथून सावनेर व शेवटी दहेगाव येथील शौर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार सचिन यादव, मंडळ अधिकारी, तलाठी वर्ग सर्व कामी लागले. तपासणी केली असता सिटी स्कोर २३ असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न व जगण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर आठवडाभरानंतर सादतकर यांची प्रकृती धोक्याबाहेर आली. आता ते ठणठणीत बरे झाले आहेत. मानसिक संतुलन ढळू न देता त्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना केला.
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळालेले जीवदान कळमेश्वर तालुक्याने अनुभवले आहे. त्यामुळे मनात कोणताही भीती न बाळगता प्रत्येकाने लस घ्यावी.
- संजय अनव्हाने
सरचिटणीस, विदर्भ पटवारी संघ, नागपूर