१७८ कर्मचाऱ्यांची पाच वर्षे पूर्ण : २६२ कर्मचारी एकाच शाखेत तीन वर्षापासून कार्यरत
अरुण महाजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : महाराष्ट्र पाेलीस दलात नागपूर ग्रामीण विभागात अंतर्गत बदलींचे वारे वाहायला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १७८ पाेलीस कर्मचाऱ्यांना एकाच शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली असून,२६२ कर्मचारी तीन वर्षापासून एकाच शाखेत कार्यरत आहेत. यातील बहुतेकांनी बदलीसाठी त्यांची प्रथम पसंती स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि द्वितीय पसंती वाहतूक शाखेला दर्शविली आहे. विशेष म्हणजे, ‘एलसीबी’मध्ये केवळ चार जागा रिक्त असून, पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या ‘गन मॅन’नेही ‘एलसीबी’लाच प्रथम पसंती दर्शविली आहे. या दाेन्ही शाखा न मिळाल्यास उमरेड व माैदा पाेलीस ठाण्यांना काहींनी पसंती दर्शविली आहे.
नागपूर जिल्ह्यातील २२ पाेलीस ठाणे सावनेर (सावनेर , केळवद, खापा, कळमेश्वर), काटोल (काटोल, नरखेड, जलालखेडा, कोंढाळी), नागपूर ( बुटीबाेरी, एमआयडीसी बुटीबाेरी, बेला), उमरेड (उमरेड, भिवापूर, वेलतूर, कुही), रामटेक (रामटेक, देवलापार, पारशिवनी, अरोली) व कन्हान (कन्हान, खापरखेडा, मौदा) या सहा उपविभागात तसेच स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतूक शाखा, सायबर सेल, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाचक शाखा, अप्पर पोलीस अधीक्षक वाचक शाखा या आठ शाखांमध्ये विभागण्यात आला आहे.
पाेलीस दलात अंतर्गत बदलींचे वारे वाहायला सुरुवात हाेताच पाेलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या शाखा व पाेलीस ठाणे यासाठी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. एकाच शाखेत तीन व पाच वर्षे पूर्ण झालेल्या एकूण ४४० पाेलीस कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली हाेणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आपापल्या सर्वांगीण साेयीच्या शाखा व पाेलीस ठाणे मागितली आहेत. १६५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी ‘एलसीबी’ला प्रथम पसंती दर्शविली असून, १४७ च्या आसपास कर्मचाऱ्यांनी ‘एलसीबी’साेबतच जिल्हा वाहतूक शाखा मागितली आहे.
जर दाेन्ही पर्याय शक्य नसेल तर ‘अप-डाऊन’ करणे साेयीचे व्हावे म्हणून नागपूर शहरालगतच्या पाेलीस ठाण्यांना विनंती अर्जात पसंती दर्शविली आहे. वृद्ध आई वडिलांची सेवा करणे, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबातील सदस्यांचे आराेग्य या महत्त्वाच्या कारणांमुळे नागपूर शहरापासून जवळच्या पाेलीस ठाण्यांमध्ये आपल्याला नियुक्ती मिळावी, असा उल्लेखही पाेलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदली विनंती अर्जात केली आहे.
पाेलीस कर्मचाऱ्यांकडून बदलींसाठी विनंती अर्ज प्राप्त झाले आहेत. विनंती व पसंती स्थळ आणि रिक्त जागा याचा ताळमेळ बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या यादीमध्ये ऐनवेळी फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. बदली करताना त्या कर्मचाऱ्याचे समुपदेशन केले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याने खासगीत दिली.
...
या ठाण्यांना पसंती
खापरखेडा - नागपूर शहरापासून जवळ, रेतीचा उपसा व वाहतूक.
कळमेश्वर - नागपूर शहरापासून जवळ, मुरुमाचा अवैध उपसा व वाहतूक.
बुटीबाेरी, उमरेड, मौदा - नागपूर शहरापासून जवळ, जनावरे, दारूची अवैध वाहतूक.
...
या ठाण्यात ‘नकाे रे बाबा’
रामटेक, देवलापार, अराेली - नागपूर शहरापासून दूर.
काटोल, नरखेड, जलालखेडा, वेलतूर, कुही, बेला - नागपूर शहरापासून दूर, प्रभावी मिळकतीची साधने नाही.
कन्हान - नागपूर शहरापासून जवळ, वाढती गुन्हेगारी व राजकीय दबावामुळे डाेकेदुखी.
...
शांत व क्रिम पाेलीस ठाणे
नागपूर जिल्ह्यात
खापा, भिवापूर, एमआयडीसी बुटीबोरी, कोंढाळी व केळवद या पाेलीस ठाण्यांची शांत व क्रिम पाेलीस ठाणे अशी ओळख आहे. खापा, एमआयडीसी बुटीबोरी, कोंढाळी हे ठाणे नागपूर शहरापासून जवळ तर भिवापूर व केळवद दूर आहे. तरीही या ठाण्यांना पाेलीस कर्मचाऱ्यांनी नियुक्तीसाठी पसंती दर्शविली आहे.
...
४४० पाेलीस कर्मचाऱ्यांचा हाेणार बदल्या
विनंती बदली अर्ज - २६२
सर्वसाधारण बदली अर्ज - १७८
स्थानिक गुन्हे शाखा - १६५
जिल्हा वाहतूक शाखा - १४७