नागपूर - उन्हाळ्याच्या झळांनी विदर्भ तापू लागला असतानाच बुधवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया जिल्ह्याला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आंब्यासह भाजीपाला पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले असून, होळीच्या उत्साहावरही विरजण पडले.भंडारा जिल्ह्यात दुपारी अचानक गारांसह वादळी पावसाने हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. मोहाडी, तुमसर, भंडारा तालुक्यात गारांचा प्रचंड वर्षाव झाला. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, काटोल, मौदा, भिवापूर या तालुक्यातील बहुतांश गावांना दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. यात गहू, चणा, संत्रा आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कळमेश्वर आणि काटोल तालुक्यात अकाली आलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे कापणीला आलेला गहू भिजला तर काही ठिकाणी गहू कापणीचे काम सुरू असतानाच वादळामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सावनेर तालुक्यातील हत्तीसरा, कवठा, आष्टी, खैरी, ढालगाव, खापा, नांदोरी, परसोडी, खुरजगाव, खुबाळा, हिंगणा, रिसाळा, बावनगाव, या गावांना वादळ आणि गारपिटीचा तडाखा बसला.
नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस; होळीवर विरजण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 2:04 AM