लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तस्करांना मद्याचा पुरवठा करणाऱ्या बहुचर्चित अशोक वासनच्या मेयो इस्पितळ चौक येथील वाईन शॉपला एक महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार झोन तीनचे डीसीपी लोहित मतानी यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे मद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी मोठ्या मद्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यास पोलिसांकडून सजगता दाखवली जात नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतरच झोन तीनमध्ये मद्य व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अशोक वासन बऱ्याच काळापासून मद्य व्यवसायाशी जुळलेला आहे. त्याचे मेयो इस्पितळ चौकात वासन वाईन शॉप आहे. तो दारूची तस्करी करत होता. शिवाय, शहरातील अवैध अड्ड्यासोबतच चंद्रपुरातही दारूचा पुरवठा करत होता. गेल्या २० दिवसात क्राईम ब्रांचने दोन वेळा त्याच्या संबंधित दारूतस्करांना पकडले होते. दोन्ही प्रकरणात वासनला आरोपी बनविण्यात आले होते. त्यानंतरही वासनचे कारनामे थांबले नाहीत. त्याच्यावर पूर्वीही दारू तस्करीसोबतच पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची प्रकरणे नोंदवली आहेत. वासनच्या वाईन शॉपमुळे परिसरातील नागरिकही त्रस्त होते. त्याची पोलिसांसोबत चांगली बैठक असल्याने पोलीस त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी धजावत नव्हते. त्यामुळेच तस्करी करण्यास तो घाबरत नव्हता. पोलीस अधिकारी आणि पांढरपेशा वर्गातील लोकांसोबत असलेल्या संबंधामुळेच तो आतापर्यंत वाचला होता.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी बडे अधिकारी व ठाणेदारांना दारूतस्करीसंबंधातील मोठ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर झोन तीनचे डीसीपी लोहित मतानी यांनी मद्य व्यावसायिकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांना तस्करी आणि तत्सम कृत्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही वासनचे कर्मचारी पागलखाना चौकात चंद्रपूरच्या तस्करांना मद्याची डिलिव्हरी देताना पकडण्यात आले. या प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले होते. तेव्हापासून पोलीस वासनबाबत सजग झाले. लोहित मतानी यांनी मद्य निरोधक कायद्यांतर्गत धारा १४२ अन्वये वासनला एक महिन्यापर्यंत त्याचे दुकान बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करताना तहसील ठाणेदार जयेश भांडारकर यांनी आज वासन शॉप बंद केले. बऱ्याच काळानंतर दारूच्या दुकानावर अशा प्रकारची कारवाई झाली आहे, हे विशेष.