लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपादरम्यान प्रशासनाने ७ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिवेशनाबाबत एकमत नाही. काँग्रेसने हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशन घेण्याचे समर्थन केले आहे.शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. आ. ठाकरे यांनी या पत्रात हिवाळी अधिवेशनावर होणारा ७५ कोटी रुपयांचा खर्च विदर्भातील आरोग्य सेवा मजबूत करण्यावर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १६० खोल्यांचे गाळे अधिवेशनाच्या तयारीसाठी खाली करण्यात येत आहे. रविभवनातील टेस्टिंग सेंटर आणि आमदार निवासातील कोविड केअर सेंटरसुद्धा धोक्यात आले आहे.याउलट आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी म्हटले आहे की, करारानुसार नागपुरात कुठल्याही परिस्थितीत हिवाळी अधिवेशन व्हायलाच हवे. विदर्भातील समस्या सोडवण्यासाठी ते आवश्यक आहे. नागपुरात कोविडचे वाढते रुग्ण, वाढती मृत्यूसंख्या, मेयोमधील अपुरी सुविधा, मनपाचे अपयश यावर चर्चा होणे आवश्यक आहे. राज्य सरकार येथे आल्यास नागपुरातील समस्या दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मेयो रुग्णालयात सुरू असलेल्या अनियमिततेच्या चौकशीसाठी समिती गठित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : काँग्रेसचा विरोध तर राष्ट्रवादीने केले समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:34 AM