लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसात संपणार आहे. परंतु गेल्या दोन दिवसात केवळ २ तास २७ मिनिटेच सभागृहात कामकाज होऊ शकले. यातही ५० मिनिटांचे कामकाज गोंधळामुळे स्थगित करावे लागले. इतकेच नव्हे तर राज्यपालांच्या अभिभाषणावर आतापर्यंत चर्चाही सुरू होऊ शकली नाही.सोमवारी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवरून गोंधळ घातला. १ तास २१ मिनिटांचे कामकाज झाल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यादरम्यानही १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. मंगळवारी सभागृहात बॅनर फडकवणे व ते हिसकावण्याच्या मुद्यावर जोरदार गोंधळ झाला. सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. गोंधळामुळे केवळ १ तास ६ मिनिटांचेच कामकाज होऊ शकले. यादरम्यान ४० मिनिटांचे कामकाज स्थगित करावे लागले. ठरलेल्या कार्यक्रमानुसार राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार होती. अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील गोंधळ लक्षात घेता ही चर्चा बुधवारी सुरू करण्याची घोषणा केली. याचपकारे तीन लक्षवेधी सूचनाही सादर होणार होत्या. गोंधळामुळे या सूचनाही पुढे ढकलाव्या लागल्या.यंदा प्रश्नोत्तरेही ठेवण्यात आलेली नाही. अशावेळी आमदारांकडे स्थानिक समस्या मांडण्यासाठी केवळ लक्षवेधी सूचना हे मोठे माध्यम आहे. परंतु गोंधळामुळे ते सुद्धा होऊ शकले नाही. विदर्भातील समस्यांबाबत सत्तापक्षाद्वारे सादर प्रस्तावावरसुद्धा चर्चा सुरू होऊ शकली नाही. या प्रस्तावात मिहान, बेरोजगारी, सिंचन प्रकल्प, पर्यटन विकासासारखे मुद्दे उपस्थित केले होते, हे विशेष.गोंधळातच चार विधेयके मंजूरदरम्यान या गोंधळातच सत्तापक्षाने पहिल्या दिवशी पूरक मागण्या सादर केल्या. यासोबतच सोमवारी सादर करण्यात आलेले चार विधेयके चर्चा न होताच मंजूर करण्यात आल्या. आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केले जातील. या विधेयकांमध्ये नगर पंचायतीमधील सदस्यास पक्षांतर करण्यास बंदी, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका टाळणे व महसूल कर्मचाऱ्यांना अवैध उत्खननाचे साहित्य व उपकरण जप्त करण्याचा अधिकाराचा समावेश आहे.सभागृहात जे झाले ते अशोभनीय - नाना पटोलेमंगळवारी विधानसभेत सदस्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली. ही घटना महाराष्ट्राच्या विधिमंडळला अशोभनीय घटना असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकवणे चुकीचे आहे. ही निंदनीय घटना आहे. कुणालाही कुणाकडे धावून जाण्याची परवानगी नाही. सभागृहातील सर्व आपत्तीजनक गोष्टी नोट केल्या जात आहेत. भविष्यात असे होऊ नये. सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी याची खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.घोषणांच्या प्रॅक्टीससाठी भरपूर वेळ देणार - जयंत पाटीलदरम्यान वित्तमंत्री जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्ष नारेबाजी व घोषणा देण्याचे विसरले आहेत. त्यांना कशा घोषणा द्यायच्या याची प्रॅक्टीस करावी लागले, यासाठी त्यांना भरपूर वेळ आम्ही देऊ. भाजपाला शेतकऱ्यांची चिंता करण्याची गरज नाही. त्यांना शेतकऱ्यांचा किती पुळका आला आहे, हे शेतकऱ्यांनाही माहीत आहे. त्यामुळेच ते आज विरोधी पक्षात आहेत.