नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी तब्बल २० मोर्चांनी मंगळवारी धडक देत प्रशासनाला चांगलाच घाम फोडला.
पेन्शन संघटना, वंचित बहुजन आघाडी, अंगणवाडी कर्मचारी, संगणक परिचालक, सिकलसेल सोसायटी, समाजकार्य पदविधर, आशा संघटना, विदर्भ पटवारी संघ, कंत्राटी नर्सेस, दिव्यांग शाळा कर्मचारी, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व जबरान ज्योत जमीन संघर्ष मोर्चांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. जुनी पेन्शन संघटना, वंचित बहुजन आघाडी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात अपेक्षेपेक्षा जास्त मोर्चेकरी आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. ऐनवेळी जुनी पेन्शन संघटनेच्या मोर्चाची जागा बदलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. गोसीखूर्द प्रकल्पातील मोर्चर्ऱ्यांनी मागण्यांसाठी तणाव वाढविला होता. यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती.
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ संतप्त कर्मचाऱ्यांची हाक
-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा मोर्चा
नागपूर : ‘एकच मिशन- जुनी पेन्शन' चा नारा देत बापूकुटी सेवाग्राम, वर्धा येथून सुरू झालेली ‘पेन्शन संकल्प यात्रा’ आज मंगळवारी नागपुरात विधिमंडळावर धडकली. जुन्या पेन्शनच्या नावाने केंद्र सरकार आणि अन्य राज्य सरकारे नवीन पावले उचलत असताना महाराष्ट्र सरकार आंधळेपणाचे नाट्य करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या मोर्चाने केला. येत्या निवडणुकीत 'जो देईल पेन्शन, त्यालाच देऊ समर्थन' असा इशाराही देण्यात आला.
शेजारील पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तिसगढ, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन लागू करून तेथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे. त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत आहे. परंतु, महाराष्ट्र सरकार झोपेचे सोंग घेऊन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांचा आदर्श ठेवत ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा देत गांधीभूमी ते नागपूर विधिमंडळावर ही ‘पेन्शन संकल्प यात्रा' काढण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.
-नेतृत्व
वितेश खांडेकर, गोविंद उगले, प्राजक्त झावरे, आशुतोष चौधरी, प्रवीण बडे व सुनील दुधे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
-मागणी
: जुनी पेन्शन योजना लागू करा.