: नागपूर : डिसेंबर महिना संपत आला, तरीही अद्याप पाहिजे तशी कडाक्याची थंडी पडली नाही. मात्र, हिवाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या आमदारांसह अधिकारी, कर्मचारी सर्दी, खोकल्याने बेजार झाले आहेत. आरोग्य विभागाने विधानभवनासह इतर पाच ठिकाणी स्थापन केलेल्या अस्थायी दवाखान्यात मागील पाच दिवसांत ३,६०५ रुग्णांनी औषधोपचार घेतला. यात तब्बल ७० ते ८० टक्के रुग्ण हे सर्दी खोकल्याचे होते.
अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी विशेष सोय केली जाते. या वर्षी आरोग्य विभागाने विधानभवन, रवीभवन, एमएलए होस्टेल, सुयोग भवन व १६० गाळे या ठिकाणी अस्थायी दवाखाने तर हैदराबाद हाऊस व माता कचेरी परिसरात रुग्णवाहिकेतून रुग्णसेवा उभी केली आहे. आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. वनिता जैन व आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने यांच्या मागदर्शनात हे दवाखाने सुरू आहेत. बदलत्या वातावरणामुळे या दवाखान्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
-विधानभवन परिसरातील दवाखान्यात १,०२५ रुग्णांना सेवा
विधानभवन परिसरातील अस्थायी दवाखान्यातून १,०२५, रविभवन दवाखान्यातून ९००, एमएलए होस्टेल दवाखान्यातून ८५०, सुयोग भवन दवाखान्यातून १२५, १६० गाळे परिसरातील दवाखान्यातून ५३०, हैदराबाद हाऊस व माता कचेरी परिसरातील ॲम्ब्युलन्समधून १७५ असे एकूण ३,६०५ रुग्णांना रुग्णसेवा दिली. यातील जवळपास २,५००वर रुग्ण सर्दी-खोकल्याचे होते.
पोलिसांमध्ये पाटदुखीचा त्रास सर्वाधिक
सर्दी, खोकल्यानंतर पाटदुखी व अंगदुखीचा त्रास असलेले सर्वाधिक रुग्ण होते. यात पोलिसांची संख्या मोठी होती. तापाचेही काही रुग्ण आढळून आल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
५६ डॉक्टर देत आहेत सेवा
पाचही अस्थायी दवाखान्यातून ४२ मेडिकल ऑफिसर व १४ फिजीशियन असे ५६ डॉक्टर सेवा देत आहेत. त्यांच्या मदतीला ३५ नर्सेस व ब्रदर्स, २२ फार्मसिस्ट, ६ टेक्निशियन व ५ ईसीजी टेक्निशियन आहेत. या शिवाय, ११ रुग्णवाहिकांची मदत घेतली जात आहे.
-सर्वच केंद्रात कोरोनाचीही तपासणी
हिवाळी अधिवेशनात येणाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अस्थायी दवाखान्याची सोय उभी केली आहे. आतापर्यंत जवळपास ३,६०५ रुग्णांना सेवा देण्यात आली. सर्व अस्थायी दवाखान्यात महानगरपालिकेच्या मदतीने कोरोनाची तपासणीही केली जात आहे. परंतु अद्याप कोणाचाच रिपार्ट पॉझिटिव्ह आलेला नाही.
-डॉ. नितीन गुल्हाने, नोडल अधिकारी आरोग्य विभाग