योगेश पांडे
नागपूर : राज्यात सत्ताबदलानंतर महाविकास आघाडी व भाजप-शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) वारंवार आमने-सामने येत असले तरी सर्वच पक्षांमध्ये वर्चस्वाची चढाओढ सुरू आहे. २०१९ नंतर नागपुरात प्रथमच होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होर्डिंग्जच्या माध्यमातून पक्षनेत्यांच्या स्वागताची चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नागपुरातील पहिलेच अधिवेशन असून होर्डिंगबाजीत त्यांच्याच समर्थकांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या होर्डिंग्जवर शिंदेच झळकत आहेत. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचे समर्थक त्यात मागे पडल्याचे दिसून येत आहे.
हिवाळी अधिवेशन म्हटले की पक्षनेत्यांच्या समर्थकांकडून होर्डिंगबाजी करून आपणच कसे सच्चे कार्यकर्ते आहोत याचा प्रयत्न सुरू असतो. विमानतळ, पश्चिम नागपूर, व्हीआयपी मार्ग आदी ठिकाणी असलेल्या मोक्याच्या ठिकाणच्या होर्डिंग्जवर मुख्यमंत्र्यांचेच फोटो झळकत आहेत. याशिवाय विधानभवन परिसराजवळ बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्या स्वागताचेदेखील होर्डिंग्ज दिसून आले. उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात मुख्यमंत्र्यांचे जास्त होर्डिंग्ज असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
सत्ताधारी भाजपकडून नियमांना तिलांजली
दरम्यान, सोमवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एकदिवसीय बैठक नागपूर येथे झाली. या बैठकीसाठी बजाजनगर चौक ते आठ रस्ता चौकापर्यंत रस्ता दुभाजकांवर सगळीकडे भाजपचे झेंडे लावण्यात आले होते तर काही मीटर अंतरावर नेत्यांचे मोठे बॅनर्स होते. याशिवाय लक्ष्मीनगर चौक व आठ रस्ता चौकात तर भाजपच्या नेत्यांचे ३० फुटांहून जास्त उंच असलेले कटआऊट्स लावण्यात आले होते. नागपूर मनपात तीन टर्मपासून भाजपचीच सत्ता आहे व स्थानिक पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती आहे. तरीदेखील उघडपणे नियमांना तिलांजली देण्यात आली.
अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, जनतेत संताप
एकीकडे अधिकृत होर्डिंग्जवर मोठे नेते चमकले असताना शहरातील विविध मार्गांवर, चौकात अनधिकृत बॅनर्स लावण्यात आले आहे. सर्वच पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. उच्च न्यायालयाने अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवरून अनेकदा मनपा प्रशासनाला फटकारले आहे शिवाय कारवाईचे वेळोवेळी निर्देशदेखील दिले आहेत. मात्र सरकार शहरात असताना अशाप्रकारच्या विद्रुपीकरणाकडे मनपाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. सामान्य नागरिकांनी अजाणतेपणे नियम मोडला तर त्वरित कारवाई होते. आता मनपा प्रशासन पुढाकार घेणार का असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.