नागपूर : विधिमंडळाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पक्षाच्या कार्यालयात, खानावळीच्या बाजूला मोकाट कुत्रे आढळल्याने प्रसारमाध्यमांनी त्या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत महापालिकेने शुक्रवारी कुत्रे पकडणारे पथक परिसरात पाठविले.
या पथकाने जाळे घेऊन परिसरात कुत्र्यांचा शोध घेतला. एक कुत्रा भाजप कार्यालयाजवळच निवांत बसला होता. त्याला जाळ्यात पकडणार होतेच, पण त्याने हुलकावणी देत सुसाट पळ काढला. पथकातील कर्मचारी परिसरात कुत्र्यांचा शोध घेत होते. कुत्रे मात्र गायब झाले होते. दुपारपर्यंत पथक कुत्र्यांचा शोध घेऊन परतले, पण त्यांच्या हाती कुत्रे काही लागले नाही. पथक गेल्यानंतर कुत्रे सक्रिय झाले. परिसरात पुन्हा कुत्र्यांचा वावर दिसून आला.