नागपूर : विधिमंडळ परिसरातील शिवसेनेचे कार्यालय यावेळी नेमके कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेतील गटबाजीनंतर बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यालयावर कुठला गट दावा करतो व कार्यालय नेमके कुठल्या गटाला मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन होत असल्यामुळे राजकीय पक्षांमध्येही उत्साह आहे. विधिमंडळ परिसरातील राजकीय पक्षांची कार्यालय सज्ज होत आहेत. रंगरंगोटी आटोपली असून, टेबल खुर्च्यांसह फर्निचर लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवसेनेच्या मूळ कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरील शिवसेना पक्ष कार्यालयाचे नाव मात्र झाकून ठेवण्यात आले आहे. या फलकावर आता शिंदे गटाचे किंवा ठाकरे गटाचे नाव लिहिले जाईल. मात्र, या फलकावर आपले नाव लिहून घेण्यासाठी दोन्ही गटांना बरीच कसरत करावी लागणार आहे. विधिमंडळ सचिवांकडे पुन्हा एकदा पक्ष कार्यालयाच्या निमित्ताने दोन्ही गटांमध्ये जोरात सामना रंगण्याची चिन्हे आहेत.