मंगेश व्यवहारे
नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून होत आहे. अधिवेशनाच्या तयारीला प्रशासन लागले आहे. मात्र दरवर्षी अधिवेशनाच्या काळात वाहतुकीची समस्या नागपूरकरांना भेडसावते. मात्र, यंदा ही समस्या अत्याधिक त्रासदायक ठरणार आहे. कारण शहराला विधानभवनाशी जोडणारा मुख्य रस्ताच पुलाच्या बांधकामामुळे बंद केला आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा वाजणार आहे. अशात योग्य नियोजन न झाल्यास वाहतुकीची कोंडी होईल. इतकेच काय तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्धा रोड हा शहरातील सर्वांत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आहे. शहीद गोवारी उड्डाणपुलामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सुटली होती, पण २३ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील चौक आणि राणी झाशी चौकाच्या मधील पूल खचला. प्रशासनाने पुलाच्या बांधकामासाठी रस्ता बंद केला आहे. सध्या वर्धा रोडवरील वाहतुकीला सीताबर्डी भागात जायचे असेल तर शहीद गोवारी उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे, पण हा पूल अधिवेशनाच्या काळात व्हीआयपी मुव्हमेंट असल्याने सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला जातो. अधिवेशन काळात उड्डाणपूल बंद राहणार आणि खालचा रस्ताही बंद आहे. अशात वर्धा रोडवरून येणारी वाहतूक किंवा कामठी रोडवरून विमानतळाकडे जाणारी वाहतूक कशी वळविणार? त्यासाठी काय नियोजन करणार? यासंदर्भात प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.
- मोर्चांच्या गर्दीला कसे आवरणार?
अधिवेशनादरम्यान मोर्चाचे ३ पॉईंट असतात. त्यातील सर्वांत मोठा पॉईंट यशवंत स्टेडियम आहे. पुलाच्या बांधकामामुळे वर्धा रोड बंद असल्याने रहाटे कॉलनीकडून येणारी वाहतूक पंचशील चौकातून उजवीकडे वळविण्यात आली आहे. यशवंत स्टेडियमसमोरून अथवा धंतोली पोलिस स्टेशन चौकातून सीताबर्डीकडे वाहने जातात. यशवंत स्टेडियमसमोरील मैदानात वाहनांचे पार्किंगतळ झाले आहे. शिवाय मेहाडिया चौक ते मुंजे चौक दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
अधिवेशनाच्या काळात यशवंत स्टेडियम पॉईंटवरून सर्वाधिक मोर्चे निघतात. काही मोर्चे पंचशील चौक मार्गे वर्धा रोडवरून मॉरेस पॉईंटकडे जातात, तर काही मोर्चे मुंजे चौकातून व्हेरायटी चौक मार्गे मॉरेस पॉईंटवर नेले जातात, पण यंदा पंचशील चौकातील रस्ता बंद आहे. शिवाय यशवंत स्टेडियमसमोरील मैदानात वाहनांचे पार्किंग केले जात आहे. सध्या मेहाडिया चौक ते पंचशील चौक दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी आहे. अशात अधिवेशनात निघणारे मोर्चे कुठल्या मार्गाने वळविणार?, त्यांच्या वाहनांची पार्किंग कुठे करणार? या मार्गावरील नियमित वाहतूक अधिवेशन काळात कुठे वळविणार? हा प्रश्न वाहतूक पोलिस आणि प्रशासनाला सोडविणे चांगलेच अवघड होणार आहे.
- रामदासपेठेतील पुलाचाही तिढा कायम
रामदासपेठेतील विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल ऑगस्ट २०२२ मध्ये खचला होता. त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. ३१ ऑक्टोबर पुलाच्या बांधकामाची डेडलाईन होती. डेडलाईन संपल्यानंतरही पुलाचे बांधकाम झाले नाही. हा पूल बनला असता तर वाहतुकीला काहीसा दिलासा मिळाला असता.
विधिमंडळ सचिवालय सोमवारी येणार
- हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईतील विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी सोमवारी (दि. २७) नागपुरात दाखल होतील.
- ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होणार आहे. २० तारखेपर्यंत कामकाज निश्चित करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण सचिवालय मुंबईतून नागपुरात येते.
- सोमवारी (दि. २७) अधिकारी, कर्मचारी येथे दाखल होणार आहेत. त्यापूर्वी आवश्यक कागदपत्र घेऊन ट्रक रवाना होतील.
- हे ट्रकही सोमवारी येणार असल्याचे सांगितले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास, सुयोग निवास, १६० गाळे तयार करण्यात येत आहे.