नागपूर: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यपाल, मंत्र्यांकडून झालेला महापुरुषांचा अवमान, भाजप आणि शिंदे गटातील नेते, आमदारांकडून केली जाणारी धमकीची वक्तव्य यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पहायला मिळाले. महापुरुषांचा अवमान होत असताना तुमची सटकत कशी नाही, असा सवाल पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला आणि तुमची सटकली पाहिजे, असे वक्तव्य पवारांनी केले.
राष्ट्रपुरुषांबद्दल जाज्वल अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले, आंबेडकर यांचा संविधानिक पदावर बसलेले लोक अपमान करतात. अशा लोकांना परत पाठवायला हवे, हकालपट्टी करायला हवी अशी मागणी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार यांनी केली.
महापुरुषांच्या अवमानाचा वाचला पाढा
राज्यपाल महापुरुषांचा अवमान करतात, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात, मंत्री ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवली म्हणतात, एक तर म्हणतो शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणतो शिवाजी महाराजांनी माफी मागितली, मंत्री म्हणतात शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गनिमी कावा केला, छत्रपतींचा गनीमी कावा राष्ट्रासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी होता, त्यांचा गनिमी कावा मुख्यमंत्रीपदासाठी नव्हता, असे सांगत इतिहासाची मोडतोड सुरू असूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का आहेत, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.यापुढे महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा लोकांना जेलमध्ये टाका, त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडू दया, अशी मागणी अजित पवारांनी केली.
अब्दुल सत्तारांना सरकारने खुली सूट दिली आहे का असा सवाल विचारत महिला खासदारांबद्दल त्यांनी किती वेळा अपशब्द वापरले. सरपंच निवडून दिला नाही तर निधी देणार नाही अशी धमकी आमदार देतात, दादरला आमदार गोळीबार करतो पण कारवाई होत नाही, एक आमदार विरोधकांचे हातपाय तोडायची धमकी जाहीरपणे देतात मात्र गुन्हा दाखल होत नाही, चुन चुन के मारूंगा असे आमदार म्हणतात हे राज्यात काय चालले आहे असा सवाल अजित पवारांनी सरकारला विचारला.
मुख्यमंत्र्यांचे पेन जप्त करा
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर नागपूरच्या विधानभवनात शाईचे पेन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा धागा पकडून विधानसभेत बोलताना अचानक अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पेन जप्त करा, अशी मागणी केली. अजित पवार काय मागणी करत आहेत हे मुख्यमंत्र्यांनाही काही काळ समजले नाही आणि ते बुचकळ्यात पडले. विधानभवनात शाईचे पेन आणण्यास मनाई आहे, मग मुख्यमंत्र्यांचे शाईचे पेन असेल तर जप्त करा असे अजित पवार बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजित पवार काय संदर्भात बोलत आहेत हे लक्षात आले.