विदर्भातील मंत्र्याने अपमान केल्याने मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:24 PM2023-12-14T21:24:31+5:302023-12-14T21:28:17+5:30
Winter Session Maharashtra 2023: हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
Winter Session Maharashtra 2023: ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा, ओबीसी समाजातील युवकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा गावगाड्यातील माणूस गुण्या-गोविंदाने रहावा, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली. त्याचबरोबर विदर्भातील एका मंत्र्याने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा अपमान केला म्हणून त्यांनी राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले. या स्वराज्यात सर्व जाती धर्माची माणसे गुण्या-गोविंदाने राहत होती. पण महाराष्ट्रात परिस्थिती बदलत आहे. एकमेकांचे साथीदार वैरी होत आहेत, असे सांगत सरकारने समाजात सलोखा निर्माण केला पाहिजे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा विदर्भातील मंत्र्याने अपमान केला. या अध्यक्षांना, सदस्यांना राजीनामा द्यायची वेळ आणली, हे कोणामुळे झाले, अशा पद्धतीने का वागणूक दिली जाते. हे योग्य नाही, असे खडेबोल विजय वडेट्टीवाार यांनी राज्य सरकारला सुनावले.
हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजातील अनेक जातींना हक्काचे घर नाही. वाशीम मधील पाड्यावर मुलींना अंघोळीला पाणी मिळत नाही. गरिबीमुळे मुलींचे शोषण केले जाते. हे गंभीर असून, आपण या समाजाच्या समस्यांचा विचार करणार आहोत की नाही. समाजात मतभेद निर्माण करून राज्याला अधोगतीकडे न्यायचे आहे का? या राज्यातील तरुण नोकरीसाठी फिरतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. चंद्रपुरात ओबीसी युवकांचे उपोषण सुरु आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत, अशा इतर सर्व समाजाच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारमधील मंत्रीच मागण्या करत आहेत. हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
ओबीसी आमचा डीएनए असे म्हणणाऱ्याना ओबीसींसाठी वेळ मिळत नाही
मराठा समाजाला आरक्षण देऊ, ओबीसी हक्काचं संरक्षण करू अशी भूमिका असली पाहिजे. ओबीसी आमचा डीएनए असे म्हणणाऱ्याना ओबीसींसाठी वेळ मिळत नाही. पदभरती, महागाई ,बाहेर जाणारे उद्योग हे विषय आता बाजूला पडले आहेत. आता तर अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात अबकड वर्गीकरण सरकार आणणार आहे. म्हणजे पुन्हा जातीजातीत भांडणे लावण्याचा डाव आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, ओबीसी समाजात हक्काचे घर नसलेल्या अनेक जाती आहेत. मी मंत्री असताना घरकुल योजना आणली. ७० हजार घरकुले झाली. ओबीसींच्या ७२ वसतिगृहांसाठी पाठपुरावा सुरु आहे. ओबीसींच्या कार्यालयासाठी २८ कोटी मागितले आहेत. ओबीसींसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेतले जात नाही. सरकारला उपाशी माणसाच्या वेदनांची जाणीव नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.