मंगेश व्यवहारे
नागपूर : बुधवारी सायंकाळी ६ वाजेची वेळ! इंदोऱ्याहून एका रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका एलआयसी चौकातून मेयो रुग्णालयाकडे जायला वळली. ती वाहनांच्या कचाट्यात सापडली. याच वेळेस दुसरी रुग्णवाहिका रिझर्व्ह बँक चौकातून रेल्वे स्टेशनकडे जात होती. ती देखील किंग्सवे हॉस्पिटलच्या चौकात अडकली. रुग्णवाहिकांच्या घोंगावणाऱ्या सायरनने परिसर दणाणून सोडला खरा, पण वाहनांच्या कचाट्यातून रुग्णवाहिका काढायला मार्ग काही मिळत नव्हता.
दोन मिनिटांत रुग्णालयात पोहोचणाऱ्या रुग्णवाहिकेला पोहोचायला अर्ध्या तासाच्या जवळपास कसरत करावी लागली. आता विचार करा अधिवेशन काळात कशी स्थिती येईल आणि रुग्णांना गोल्डन अवरमध्ये खरोखर उपचार मिळतील का?
विदर्भच नाही तर मध्य भारतातील रुग्णांसाठीही नागपुरातील धंतोली , रामदासपेठ, मेडिकल, बजाजनगर हा परिसर मेडिकल हब म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शहरात सर्वांत जास्त रुग्णवाहिकेचा जोर या भागात राहतो. या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.
२३ सप्टेंबरपासून वर्धा रोड बंद झाल्यामुळे वाहनचालकांचा मनस्ताप आणखी वाढला आहे. अशात अधिवेशन काळात किती त्रास होईल याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने विधिमंडळाच्या परिसरातील वाहतुकीचा आढावा घेतला असता, काही ठळक बाबी पुढे आल्या.
मानकापूर उड्डाणपूल
सावनेर, काटोल, पारशिवनी मार्गाने शहरात येणाऱ्या रुग्णवाहिका मानकापूर उड्डाणपुलावरून रिझर्व्ह बँक मार्गे धंतोली रामदासपेठ भागात येतात. मानकापूर उड्डाणपूल झाल्याने रुग्णवाहिकेचा वेळ कमी झाला आहे. पण, अधिवेशन काळात रिझर्व्ह बँक चौकातील वाहतूक बराच काळ बंद असते. त्यामुळे रुग्णवाहिका एलआयसी चौकाकडे वळविण्यात येईल. एलआयसी चौकातून रामझुल्यावरून मेयो हॉस्पिटल चौकातून यूटर्न घेऊन संत्रा मार्केट होत, मोक्षधाम घाटमार्गे धंतोलीत येणे शक्य आहे. पण, हा वळसा घेताना किती कसरत करावी लागेल, याचा अंदाज घ्या.
कामठी रोड
सध्या कामठी रोडवरून येणाऱ्या रुग्णवाहिका इंदोऱ्यातून एलआयसी चौक होत गोवारी उड्डाणपुलावरून रामदासपेठेत येतात. पण, अधिवेशन काळात या मार्गावरून येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही असाच वळसा घ्यावा लागणार आहे. कारण मोर्चे, शहरातील वाहतूक आणि व्हीआयपींचे अवागमन असल्याने किमान दोन तासांचा हा फेरा ठरू शकतो.
रेल्वेस्थानकाजवळ वाहतुकीची कसरतच
सेंट्रल एव्हेन्यूकडून येणारी वाहने रामझुल्यावरून नवीन उड्डाणपुलावरून एलआयसी व आरबीआयकडे जातात. काही वाहने नवीन उड्डाणपुलाखालूनही जातात. पण, खालच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने रेल्वेस्थानकाजवळ रस्ता बंद केला आहे. त्यामुळे वाहतूक टेकडी रोडवरून जयस्तंभ चौकाकडे वळविली आहे. पण, अधिवेशन काळात नवीन उड्डाणपुलाचा मार्ग बंद केला तर वाहतुकीची चांगलीच पंचायत होणार आहे.
धंतोली, रामदासपेठेची काय राहील अवस्था?
अधिवेशन काळात शहीद गोवारी उड्डाणपूल बंद असल्याने वर्धा रोड, भंडारा रोड, उमरेड रोडवरून येणारी वाहतूक धंतोली आणि रामदासपेठेतून ये-जा करणार आहे. त्यामुळे धंतोली आणि रामदासपेठेतील गल्लीबोळ्यातही वाहतुकीचा जाम लागणार आहे. रहाटे कॉलनी चौक, लोकमत चौक, बजाजनगर चौक या मार्गांवर वाहतुकीची कोंडी होणार आहे. कारण हा एकच मार्ग वाहतुकीसाठी सोयीस्कर असणार आहे.