मंगेश व्यवहारे
नागपूर : एक मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे नागपूरकरांना किती कसरत करावी लागते, याचा अंदाज दररोज वाहनचालक घेताहेत. अधिवेशन काळात काय हाल होतील, याचा विचारही गोंधळून टाकणारा आहे. या काळात सद्याच्या मार्गाने सिव्हिल लाइन किंवा सीताबर्डीत गेल्यास एक तर वाहनचालक ब्लॉक होईल किंवा हा खोळंबा टाळण्यासाठी त्यांना १० ते १२ किलोमीटरचा फेरा करून आपले घर किंवा कार्यालय गाठावे लागणार आहे. अधिवेशन काळात वाहतुकीचा कसा खोळंबा होईल, याचा आढावा लोकमत प्रतिनिधीने घेतला असता वाहनचालकाला मनस्ताप होईल, अशी अवस्था आहे.
- अधिवेशन काळात काय असते परिस्थिती
विधिमंडळ इमारतीच्या आसपासचा संपूर्ण परिसरात सामान्यांची वाहतूक बंद असते. आकाशवाणी चौक, व्हीसीए सदर, एलआयसी चौक, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, संविधान चौक, जयस्तंभ चौक, व्हेरायटी चौक या संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक बंद असते. संघटनांचे मोर्चे यशवंत स्टेडियम, चाचा नेहरू बालउद्यान, इंदोरा चौकातून विधिमंडळावर धडकतात. यातील सर्वाधिक संख्या यशवंत स्टेडियम येथून असते. मोर्चाला मॉरेस पॉइंट व टेकडी रोडवर थांबविले जाते. त्यामुळे हा रस्ता बंद केल्या जातो. मोर्चामुळे एलआयसी चौकात बंद केला जातो. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स जवळही मोर्चे थांबविले जात असल्याने एक मार्ग बंद केला जातो.
- सद्या काय होतेय, हे जाणून घ्या
पंचशील ते झाशी राणी चौकादरम्यानचा पूल कोसळल्याने हा मार्ग बंद आहे. त्यामुळे वाहतूक शहीद गोवारी उड्डाणपुलावरून सुरू आहे. इंदोरा, सिव्हिल लाइन या भागात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी उड्डाणपुलासह व्हेरायटी चौक ते मुंजे चौक, झिरो माइल चौक ते टेकडी रोड ते कॉटन मार्केट, आरबीआय चौक ते रेल्वे पूल ते रामझुला असा प्रवास करावा लागतो. या मार्गावर सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ७ पर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी असते. वाहतुकीच्या कोंडीमुळे १५ मिनिटाच्या प्रवासाला तासभर लागतो आहे. या मार्गावरून ट्रॅव्हल्स, आपली बसची रहदारी अधिक असते. त्यामुळे नोकरदारवर्गाला दररोजचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- अधिवेशन काळात काय होईल
अधिवेशनाच्या काळात गोवारी शहीद उड्डाणपूल बंद राहील. मोर्चामुळे टेकडी रोड बंद राहील, आरबीआय ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स मार्ग बंद राहील, उत्तरेकडील वाहतूक एलआयसी चौकातून बंद होईल. विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचल्याने तो मार्ग बंद आहे. रेल्वे स्टेशनसमोरील पूल तोडल्याने जयस्तंभ चौकापासून वाहतूक बंद केली आहे. त्या काळात केवळ सीताबर्डी मार्केट रोड व आनंद टॉकीज ते मुंजे चौक हे मार्ग सुरू राहतील. पण सीताबर्डीचा मार्केट रोड हा वन-वे आहे. त्यामुळे एकच रस्ता रहदारीसाठी शिल्लक आहे. या रस्त्यावरून मध्य नागपूर, पूर्व नागपूर, दक्षिण नागपूरच्या वाहतुकीचा पूर्ण भार येणार आहे. त्या काळात हा रस्ता पार करणे म्हणजे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासारखेच ठरेल.
- कसा होईल फेरा
१) दक्षिण नागपुरातून सिव्हिल लाइन्स अथवा सीताबर्डीत नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी यांना अधिवेशन काळात लांबचा फेरा करावा लागेल. दक्षिणकडून येणाऱ्या लोकांना अजनी पुलावरून आल्यावर रहाटे कॉलनी चौकातून लोकमत चौक होत, काचीपुरा चौकातून अलंकार टॉकीज चौक किंवा आयटीआयमार्गे दीक्षाभूमी, लक्ष्मीनगर चौक होत शंकरनगर मार्गे निघावे लागेल. याकाळात अजनी पुलावरची परिस्थिती अतिशय भीषण असणार आहे. कारण सद्या सकाळी १० ते ११ आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत या पुलावरून प्रवास करणे कसरतीचे आहे.
२) पूर्व नागपुरातील वाहतूकदाराला सिव्हिल लाइन्स किंवा सीताबर्डीत ये-जा करण्यासाठी सदर, कडबी चौक होत इंदोरा चौक, पाचपावली पुलावरून गोळीबार चौक अग्रेसन चौक असा प्रवास करावा लागणार आहे. दक्षिण पश्चिम आणि मध्य नागपूरच्याही लोकांनाही अशाच काहीशा परिस्थितीचा सामना करावा लागेल.
३) उत्तरेकडील नागरिकांना वर्धा रोडचा प्रवास अवघड ठरणार आहे. अधिवेशन काळात गोवारी उड्डाणपूल बंद असल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाहतूकदारांना सदर, व्हीसीए स्टेडियम, हायकोर्ट चौक, जिल्हा परिषदेसमोरून बोले पेट्रोलपंप चौक होत, अलंकार टॉकीज, काचीपुराचौक मार्गे लोकमत चौक होत वर्धा रोडवर लागावे लागले. अथवा पाचपावली पुलावरून महाल, उंटखाना चौक, मेडिकल चौक होत अजनी पुलावरून चुनाभट्टी मार्गे वर्धा रोडवर यावे लागेल.