लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित करण्यात आला. यातील आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई करण्यात येईल. तसेच प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात येईल व तपासात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडला होता. दानवे यांनी या प्रकरणातील आरोपी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष असल्याचा मुद्दा मांडला. यावर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. फरार आरोपींना शोधण्यावर भर देण्यात येत आहे.
सीआयडीकडे हे प्रकरण देण्यात आले असून, त्यांची 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्यात येईल. ज्या पोलिसांनी कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यावर नाहक अंगुलीनिर्देश होतो
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राजकीय पक्ष व नेत्यांवरील आरोपांवरही भाष्य केले, हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असते. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे ज्यावेळी बोलले जाते, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतानादेखील त्यांच्याकडे कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो, असे फडणवीस म्हणाले. आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, असा विचार न करता घटनेत सहभागी प्रत्येकावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बीड, परभणीच्या घटना गंभीर; चर्चेची तयारी
बीड, परभणी येथे घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून, संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. परभणी येथे संविधानाचा अपमान करणारी व्यक्ती मनोरुग्ण होती. एका मनोरुग्णाच्या कृत्यावर संवैधानिक प्रतिक्रिया उमटावी, अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत, यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.