'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:39 PM2023-12-06T18:39:01+5:302023-12-06T18:52:36+5:30
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
नागपूर- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. आज विरोधी पक्षांनी चहापान कामांवर बहिष्कार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला पाहिजे, विरोधकांना विदर्भ, मराठवाड्याशी काहीही संबंध नाही हे त्यांच्या भूमिकेवरुन दिसते, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
"पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित"; अमित शहांची मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या राज्याची अर्थव्यवस्था १६ लाख कोटींवरुन ३५ लाख कोटीवरुन गेली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बॅलन्सड आहे. आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेले आहेत, ते आम्ही बघितलं, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
"क्राइम रेटमध्ये महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे याच प्रशिक्षण विरोधी पक्षांना द्यायला पाहिजे, आम्ही येताना काही बॅनर लागलेले बघितले की दहा दिवसच अधिवेशन, आता ज्यांनी नागपूरात अधिवेशनच घेतले नाही, ते आम्हाला हे सांगत आहेत. नागपूरात अधिवेशन घ्यायची वेळ आली की राज्यात कोविड यायचा, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. सभागृहात सर्व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, ज्या प्रकारे चर्चा होतील त्या करायला आम्ही तयार आहोत. शेतकऱ्यांचं भल व्हायला पाहिजे यासाठी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आता तीन राज्यांमध्ये जो पराभव झाला आहे त्याचे विरोधी पक्ष आत्मपरिक्षण करेल अन्यथा ईव्हीएम मुळे जिंकले, देशात आता दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होतंय अस समाधान यांनी करुन घेतलं आहे, असंही ते म्हणाले.