नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरले आहे. विरोधी पक्षांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला, यावरुन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे, कर्नाटक विरोधी ठराव संमत करण्यात आला. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. काल दोन्हाबाजूंनी आरोप-प्रत्यारोप तसेच खोचक टोले लगावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. काल महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील आमदारांच्या सह्या आहेत, पण विरोधी पक्षनेते अजित यांची या प्रस्तावावर सही नसल्याचे समोर आले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठरावाचा प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे देण्यात आले आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
काल महाविकास आघाडीची काँग्रेस विधीमंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, या प्रस्तावार महाविकास आघाडीतील ३९ आमदारांनी सह्या केल्या. पण, हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अविश्वास ठराव दिला असला तरी याबाबत महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.'या प्रस्तावा संदर्भात मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
कोल्हापुरात बसून करा थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!, नागरिकांची मोठी सोय होणार
या प्रस्तावामध्ये आमदार नाना पटोले, अजय चौधरी, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रतिभा धानोरकर, विक्रमसिंह सावंत, संजय जगताप, संग्राम थोपटे, नितीन देशमुख, यशवंत माने, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे या आमदारांच्या सह्या आहेत, यात राष्ट्रवादी, काँग्रेसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांच्या सह्या आहेत. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नसल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.