नागपूर : कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. हतबल झालेला शेतकरी आत्महत्या करत असून महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्येचे हब झाले आहे. नुकसान होऊनही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पीकविम्या कंपन्यांना भरमसाठ नफा होत आहे. या मुजोर विमा कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, या कंपन्यांना सरकार आणि अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का ? असा सवाल विचारत विमा कंपन्यांच्या नफ्याचा वाटा कुणा कुणाला मिळाला ? कोण कोण यात वाटेकरी आहेत, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.
विधानसभेत नियम १०१ अन्वये विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांद्याला निर्यात बंदीचा फटका बसला, धानावर २० टक्के निर्यात शुल्क लादले, संत्रा निर्यातीवर बंदी आली. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने विदर्भातील राईस मिलचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तुटपुंजी मदत
पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आणि १९ हजार शेतकऱ्यांसाठी फक्त ११ कोटींची मागणी अधिकाऱ्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात पंचनामे होऊन इतकी तुटपुंजी मदत मिळत असेल तर शेतकरी आपली व्यथा कुठे मांडेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मंत्र्यांच्या तालुक्यातच दुष्काळ जाहीर
राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० पैकी ३५ तालुके आमदारांचे असून त्यापैकी २९ तालुके मंत्र्यांचे आहेत. सरकारने तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला आहे आता सरसकट दुष्काळ जाहीर करून बागायतीसाठी हेक्टरी १ लाख, जिरायतीसाठी ५० हजार मदत जाहीर करावी, वीज बिले माफ करावे, पीक विमा दिला पाहिजे, पीक कर्जाचे पुनर्गठन करताना ते बिन व्याजी असावे, सरकारने इतर कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
यांनीही घेतला सहभाग
विधानसभेत आ. रईस शेख, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बालाजी कल्याणकर, बच्चू कडू, नारायण कुचे, प्रकाश साळुंखे, विश्वजीत कदम, समीर कुणावार, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, डाॅ. संजय रायमूलकर, ॲड.आशीष जयस्वाल, राजेश टोपे, योगेश सागर, प्रकाश आबिटकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.