कमल शर्मा
नागपूर : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात २० सदस्यच आहेत. सर्व कॅबिनेटमंत्री आहेत. विरोधीपक्ष यावरून नेहमीच हल्ला चढवत असतो. आपसातील मतभेदामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचा विरोधी पक्षाचा आरोप आहे. परंतु हिवाळी अधिवेशनादरम्यान किंवा त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे प्रशासनाला वाटत आहे. याच दृष्टिकोनातून मंत्री-राज्यमंत्र्यांसाठी ४० बंगले तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘रामगिरी’ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगला मिळून ही संख्या ४२ झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत असले तरी, प्रशासन मात्र तयारीत आहे. नागपुरात पूर्णकालीन सदस्यांच्या राहण्याचा बंदोबस्त होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था रविभवनात होते. येथे एकूण ३० कॉटेज आहेत. यातील सहा कॉटेज क्रमश: विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, दोन्ही सभागृहातील विरोधीपक्ष नेत्यांसाठी आरक्षित आहेत.
मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी आरक्षित असते. रविभवनातील उर्वरित २४ कॉटेज कॅबिनेटमंत्र्यांसाठी असतात. परंतु शिंदे आणि फडणवीस यांच्यासाठी आधीच बंगले आरक्षित असल्यामुळे उर्वरित १८ मंत्र्यांच्या व्यवस्थेसाठी रविभवनातच २४ कॉटेज आहेत, तर राज्यमंत्र्यांसाठी नागभवनात १६ कॉटेज आरक्षित आहेत. सध्या मंत्रिमंडळाच कोणतेच राज्यमंत्री नाहीत, त्यामुळे सद्यस्थितीत ते रिकामे राहणार आहे.
रविभवनातील सहा कॉटेजही रिकामे राहणार असल्याची स्थिती आहे. परंतु प्रशासनाने मुख्यमंत्र्यांसह ४० सदस्यांच्या निवासाची व्यवस्था करून ठेवली आहे. रविभवनासोबतच नागभवन, रामगिरी, देवगिरी तयार करण्यात आले आहे. अखेरच्या टप्प्यातील कामे सुरु आहेत. अधिकाऱ्यांच्या मते त्यांचे काम पूर्णकालीन मंत्रिमंडळाच्या निवासाची व्यवस्था करणे आहे. अधिवेशनात विस्तार झाल्यास नव्या मंत्र्यांसाठी कॉटेज तयार राहणार आहेत. गुणवत्तापूर्ण आणि गतिशील काम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
कोणती होताहेत कामे
- कॉटेजची आतील आणि बाहेरील पेंटिंग.
- छताला नवे रूप देण्यात येत आहे.
- टॉयलेट, बाथरुमचे आधुनिकीकरण.
- खिडकी, दारांची दुरुस्ती, पॉलिश.
- कोरोनात सॅनिटायझेशनमुळे खराब झालेले फर्निचर, पडदे बदलणे.
- बाहेरील परिसरातील गवत कापणे, फांद्या कापणे.
फडणवीसांना हवे कॉटेज क्रमांक पाच
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना रविभवनातील कॉटेज क्रमांक पाच देण्याची परंपरा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आधीच देवगिरी बंगला आरक्षित आहे. सध्या फडणवीसांच्या कार्यालयाने रविभवनातील कॉटेज क्रमांक पाचची मागणी केली आहे. येथे फडणवीस यांचे स्थानिक कार्यालय सुरू करण्याची योजना आहे, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आरक्षित कॉटेज क्रमांक ११ साठी कोणतेच मंत्री इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. एक-दोन दिवसांत कॉटेज आरक्षणाबाबत समितीची बैठक अपेक्षित आहे. या बैठकीत कोणता बंगला कोणाला द्यायचा हे ठरणार आहे.
पाण्याच्या टाक्याही होताहेत स्वच्छ
बाटलीबंद पाण्यावर ५० लाखांचा खर्च चर्चेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरवठादारांवर लगाम लावला आहे, तर महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावरही विश्वास वाढला आहे. परिणामी रविभवन, नागभवन, विधानभवनात पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत असून, नव्या पाण्याच्या टाक्या लावण्यात येत आहेत.