Winter Session Maharashtra ( Marathi News ) नागपूर- काल विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबईतील उर्दू शाळेवरुन भाजपा आमदार नितेश राणे आणि शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सभागृहात दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा भागात उर्दू शिक्षण केंद्राच्या उभारणीबाबत भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावाद्वारे मुद्दा उपस्थित केला. यावरुन त्यांनी महाविकास आघाडीवर आरोपही केले. तसेच आमदार कोटेचा यांनी उर्दू केंद्राच्या ठिकाणी आयटीआयची उभा करण्याची मागणी केली. या मागणीला भाजप आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला.
शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, या परिसरात बारा उर्दू शाळा आहेत. या ठिकाणी आयटीआय कॉलेज व्हायला पाहिजे, उर्दू भवनचे काम नियमबाह्य सुरू असून ते बंद करा. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, या उर्दू भवनचे काम किती टक्के झाले आहे. कुणी मंजूर केले, काय केले याची आपल्याला माहिती घेता येईल. यात आपल्याला स्थानिक आमदारांचे मत देखील महत्वाचे आहे, त्यांनाही बोलायला दिले पाहिजे.
यावेळी सभागृहात गोंधळ झाला. या मुद्द्यावर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी माहिती दिली. आमदार जाधव म्हणाल्या, उर्दू ही कोणतीही मुस्लिम भाषा नाही. माझ्या मतदार संगात मुस्लिम बांधव आहेत, त्यांनी ही मागणी केली होती. ११ वर्ष महानगर पालिकेने आयटीआयला जागा दिली असतानाही त्यांनी काहीही केले नव्हते. माझ्याच मतदार संघात आणखी एक आयटीआय कॉलेज आहे तिथे विद्यार्थी नाहीत. यात कोणतीही गोष्ट अनधिकृत केलेली नाही. सर्व बैठकींचे मी पुरावे देते, उर्दू लर्निंक सेंटरला कुणीही विरोध करु नये , जे केलं आहे ते अधिकृत केले आहे, असंही आमदार यामिनी जाधव यांनी सांगितलं. यावेळी सभागृहात उर्दू शाळेच्या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.