योगेश पांडे
नागपूर : विधानपरिषदेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या काही आमदारांचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात चांगलाच ‘क्लास’ घेतला व त्यांना शिस्तीचे धडेच दिले. शिक्षक आमदार असूनदेखील विद्यार्थ्यांपेक्षा बेशिस्त का वागता, असा प्रश्नही त्यांनी केला.
प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. १२.४० वाजता हा प्रश्न पुकारण्यात आला होता. विक्रम काळे यांनी उपप्रश्न विचारण्याअगोदर वेळ घेत सविस्तर मांडणी केली. त्यांना तेव्हापासूनच वेळेचे भान ठेवा, असे उपसभापतींनी बजावले. त्यानंतर जयंत आसगावकर यांनी उपप्रश्न विचारला. तर कपिल पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरावरच हरकत घेतली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर तपासून घेऊ, असे सांगितल्यावर देखील पाटील आक्रमक झाले. चार ते पाच शिक्षक आमदारांनी प्रश्न विचारल्यावर देखील उपप्रश्नसाठी गोंधळ होत होता.
अखेर उपसभापतींनी त्यांना सुनावले, ‘मंत्री उत्तर देत असताना सारखे उभे राहणे बरोबर नाही. तुम्ही बोलायला लागले की थांबतच नाहीत. एका शिक्षक आमदाराला बोलायला दिले तर दुसरे नाराज होतात. स्वत:च्या क्षेत्राशी निगडित प्रश्न असतो तेव्हा आमदारांना ४० मिनिटे देखील कमी पडतात, मात्र दुसऱ्यांचा प्रश्न असेल तर नियम दाखवून हरकत घेतात’, असे त्या म्हणाल्या.
सभागृहात दादागिरी करायची नाही...
उपसभापतींनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना बोलण्याची परवानगी दिली. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे सदस्य अभिजित वंजारी यांनी जागेवर बसूनच याला विरोध केला व खाली बसण्यास सांगितले. यावरून उपसभापती संतापल्या, ‘वंजारी तुमच्यासारख्या सदस्याला अशी वागणूक शोभत नाही, अशी दादागिरी करू नका, कुणी बोलावे आणि बसायचे हे तुम्ही सांगायचे नाही’, या शब्दांत वंजारींना दटावले.