नागपूर - उद्धव ठाकरे सभागृहात आले त्यामुळे कदाचित गिरीश महाजन आणि सलीम कुत्ता हा विषय पुढे आणला. आरोपाची खातरजमा न करता मंत्र्यांवर आरोप केले गेले. गिरीश महाजन यांच्यावर बेछुट आरोप केल्याबद्दल विरोधकांनी माफी मागितली पाहिजे. विरोधकांनी लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. त्याचसोबत सलीम कुत्तासोबत महाजन उपस्थित असल्याचा फोटो दाखवला. त्यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. ठाकरे गटाचे अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा मागितला. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खुलासा करत विरोधकांवर पलटवार केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते, तिथे सगळ्या पक्षाचे नेते, अधिकारी होते. ते लग्न नाशिकमधील मुस्लीम धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू शहीरे खातिब यांच्या पुतण्याचे होते. त्या लग्नात पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शहीरे खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले तिच्या वडिलांच्या सासरमधील एक नातेवाईक दाऊदच्या कुठल्यातरी भावाशी लग्न झाले असा आरोप करण्यात आला होता. पण ज्यांच्याशी लग्न झाला त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, कुठलाही आरोप नाही. कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा नाही. तथापि ज्यावेळी अशाप्रकारचा आरोप माध्यमात झाला तेव्हा २०१७-१८ मध्ये मी गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती आणि तत्कालीन डीसीपींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात शहीरे खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही असा रिपोर्ट दिला होता.
त्याचसोबत आज उद्धव ठाकरे आले त्यामुळे कदाचित अशाप्रकारचे विषय आले असतील.पण एका मंत्र्यांवर असे आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्या प्रकरणाची चौकशी आधीच झालीय. अशाच प्रकारची तडफड जे बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का दाखवली नाही? कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशाप्रकारे बेछुट आरोप केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत असंही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
काय म्हणाले होते अंबादास दानवे?एकनाथ खडसे, अनिल परब यांनी ज्या मंत्र्यावर आरोप केले. नाशिकमध्ये २०१७ मध्ये एक लग्न झाले होते. लग्न हा खासगी विषय आहे. पण या लग्नात आयबीचे लोक होते. या लग्नामध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. पण सलीम कुत्ता १९९८ मध्ये मेलाय असा दावा विधानसभेच्या आमदाराने केला याबाबत माहिती नाही. गिरीश महाजन या लग्नात होते. महाजन हे जबाबदार मंत्री आहेत. सभागृहात हा फोटो महाजनांचा आहे त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.