- कमल शर्मा नागपूर : येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, याची घोषणा आधीच झालेली आहे. बरोबर एक महिन्यानंतर अधिवेशन सुरू होईल. परंतु अधिवेशनाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. कारण हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे तयारी संदर्भात प्रशासकीय बैठका सुरू आहेत. मात्र प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहेे.
उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे की, बहुतांश अधिकारी व विदर्भातील मंत्री कोविड संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता अधिवेशन मुंबईतच व्हावे, या विचाराचे आहेत. पुढच्या आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक होणार असून त्यात अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारवर नागपूर कराराचे पालन करण्याचा दबावही आहे. कारण याअंतर्गत नागपुरात वर्षातून एक तरी अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. मागच्या वर्षी कोविड संक्रमणामुळे येथे अधिवेशन होऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमण लक्षात घेता नागपुरात अधिवेशन घेणे योग्य होणार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरात मोठ्या प्रमाणावर लोकांनी लस घेतली आहे. त्यांची हर्ड इम्युनिटीसुद्धा विकसित झालेली आहे. तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. अधिवेशनासाठी जवळपास १५ हजार लोक बाहेरून येतील. त्यामुळे संक्रमण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे अधिवेशनाच्या तयारीलाही गती मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बीएसीच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्याची प्रतीक्षा आहे. जर बैठकीत नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला तर कामाला गती दिली जाईल. अशा परिस्थितीत २० दिवसांत तयारी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राहील. कारण अधिवेशनाच्या दहा दिवसांपूर्वी सर्व इमारती विधानमंडळाकडे सोपविणे बंधनकारक असते. अशा परिस्थितीत २७ तारखेपर्यंत तयारी पूर्ण करावी लागेल. साधारणपणे अधिवेशनाच्या तयारीचे काम दोन महिन्यांत पूर्ण होते.
आतापर्यंत वर्क ऑर्डर नाही
पीडब्ल्यूडीने तयारीसाठी ५० कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत. दरांमध्ये झालेल्या तफावतीमुळे अनेक निविदा रद्द करून त्या पुन्हा जारी कराव्या लागल्या. परंतु आतापर्यंत वर्क ऑर्डर जारी झालेले नाही. नागपुरात अधिवेशन होईल, याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावरच वर्क ऑर्डर जारी केले जातील, असे सांगितले जाते.
कॅबिनेटमध्ये होणार चर्चा - पालकमंत्री
नागपूर करार अंतर्गत शहरात अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. परंतु सध्या कोविड संक्रमण पाहता शहरातील सुरक्षेचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशनाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. नागपुरात कठोर कोविड प्रोटोकॉलमध्ये अधिवेशन होईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.