लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रातील गड किल्ले, धार्मिक स्थळे, पुरातन मंदिरे महाराष्ट्राच्या इतिहासाचा ठेवा आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांचे जतन झाले पाहिजे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होण्याच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य घालणाऱ्यांना दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक २०२४ मांडताना दिली. या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली.
प्राचीन स्मारके व धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यासाठी कायदा अधिक कठोर व्हावा, परंतु येथील मनुष्यबळाचा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेदरम्यान केली. अॅड. अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे. सदस्य शशिकांत शिंदे यांनी गड किल्ले व प्राचीन वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.