निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या आठवड्यापासून नागपुरात सुरू असलेली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जत्रा अखेर शुक्रवारी संपली. मंत्री,आमदार,अधिकारी आपल्या नेहमीच्या स्थळी पाल बांधायला निघाले. मात्र दाेन आठवड्यापासून सरकार इथे असल्याने आपल्या समस्या मांडण्यासाठी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची गर्दी येथे जमली हाेती. धरणे आंदाेलकांच्या उपस्थितीने यशवंत स्टेडियमचा परिसर जत्रा भरावी तसा फुलून गेला हाेता. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येथे शुकशुकाट पसरला हाेता. बहुतेक संघटनांचे कार्यकर्ते गुरुवारीच येथून परतले हाेते. काही आश्वासन घेऊन निघाले व काही संघटना निराश हाेत परतल्या. शुक्रवारी एकदाेन संघटनेचे माेजके कार्यकर्ते एकत्रितपणे शेवटची न्याहारी करीत हाेते. पाेलिसही निश्चिंत हाेत पेंगुळलेल्या डाेळ्यांनी सुस्तावले हाेते. जत्रा संपावी तशा धरणे मंडपाच्या पाली माेडल्या हाेत्या आणि काहीसे उदासवाने वातावरण स्टेडियमच्या परिसरात दिसून येत हाेते.
६० च्यावर संघटनांचे आंदाेलन
यशवंत स्टेडियममध्ये यावर्षी हिवाळी अधिवेशनांतर्गत ६० च्यावर संघटनांनी धरणे आंदाेलन केली. यात वेगवेगळ्या विभागातील शिक्षकांच्या संघटना अधिक हाेत्या. विद्यार्थी संघटनांची संख्याही बरीच हाेती. याशिवाय अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,जिल्हा परिषद परिचर,सेवानिवृत्त कर्मचारी,पाेलिस तसेच आदिवासींसह विविध जाती-जमातीच्या संघटनांनी लक्ष वेधले. शेतकरी संघटना, बेराेजगार संघटना,अंशकालीन कर्मचारी,शाळा स्वयंपाकीन महिला,लाेककलावंत,वनमजूर,शासकीय,अशासकीय अशा बहुतेक घटकातील लाेक आंदाेलनात सहभागी हाेते. पाच लाेकांनी व्यक्तिगत व काैटुंबिक आंदाेलन केले. आदिवासी विद्यार्थी कृती संघटना,विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती व अनुसूचित जमाती व परिगणित संघटना शेवटच्या दिवशीपर्यंत धरणे आंदाेलनात बसले हाेते. काही संघटना एक दिवस, दाेन दिवस, पाच दिवस तर काही पूर्ण अधिवेशनापर्यंत थांबल्या.
बहुतेकांच्या पदरी निराशा
सरकारकडून न्याय मिळेल,या आशेवर या संघटना हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदाेलनाला बसतात. मात्र त्या पूर्ण हाेतील याचा भरवसा नाही. काही माेजक्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना जवळचे मंत्री किवा आमदारांकडून आश्वासने मिळाली. मात्र बहुतेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निराशा मिळाल्याने सरकारवर असंताेष व्यक्त केला.
शाैचालय चालकाने घेतला फायदा
स्टेडियमच्या परिसरात आंदाेलकांसाठी शाैचालयाची व्यवस्था करण्यात आली हाेती,पण ती हजाराे लाेकांच्या मानाने पुरेशी नव्हती. त्यामुळे आंदाेलकांना भटकावे लागले. याचा फायदा स्टेडियमबाहेर मेहाडिया चाैकातील सार्वजनिक शाैचालय चालकाने घेतला. एरवी शाैचालयाचे ५ रुपये व लघुशंकेसाठी २ रुपये घेणाऱ्या चालकाने अधिवेशन काळात लघुशंकेचे ५ रुपये व शाैचालयाचे १० रुपये वसूल केले. त्यामुळे दूरवरून आलेल्या आंदाेलकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. याबाबतही शेकडाे कार्यकर्त्यांनी असंताेष व्यक्त केला.
बंदाेबस्तातील पाेलिसांना संत्राबर्फीचा माेह
अधिवेशन आटाेपताच वेगवेगळ्या जिल्ह्यातून बंदाेबस्तासाठी आलेले पाेलिस निश्चिंत झाले हाेते. सायंकाळपर्यंत परतीचा प्रवास सुरू हाेणार असल्याने दुपारपासून कुटुंबाच्या खरेदीसाठी सीताबर्डी परिसरात पाेलिसांची गर्दी हाेती. नागपुरी संत्रे व संत्राबर्फीचा सर्वाधिक माेह त्यांना असताे,त्यामुळे मिठाई दुकानात संत्राबर्फी घेण्यासाठी त्यांची गर्दी झाली हाेती.