नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन पाच दिवसातच आटोपणार की काय, अशी चर्चा आहे. परंतु विधिमंडळाच्या उच्च पदस्थ सूत्रांनुसार हिवाळी अधिवेशन हे ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे.
नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे. परंतु तसे होत नाही. साधारणपणे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरु होते. परंतु यावेळी थोड्या उशिरा म्हणजे १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होणार आहे. कोविडमुळे मागील दोन वर्षे मुंबईतच अधिवेशन झाले. त्यामुळे हे अधिवेशनसुद्धा एकच आठवड्याचे राहील, अशी चर्चा होती. परंतु विश्वस्त सूत्रानुसार हिवाळी अधिवेशन हे दोन आठवड्यांचे राहील. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस रविवारीच आहे. तसेही शनिवार व रविवारी (२४ व २५ डिसेंबर) सुट्टी राहील. शुक्रवार, ३० डिसेंबर रोजी अधिवेशनाचा समारोप होईल. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की, अधिवेशन किती दिवस चालेल, यापेक्षा अधिवेशनात किती कामकाज होईल, हे महत्त्वाचे आहे. असे असले तरी अधिवेशन किती दिवस चालेल, याचा अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समिती (बीएसी) घेईल.
परिसरात लागणार स्क्रीन
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रेक्षक व पत्रकारांसाठी असलेली जागा अतिशय कमी आहे. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर विधानभवन परिसरात मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे. यावर सभागृहातील कार्यवाहीचे थेट प्रसारण पाहता येईल.