नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनंतर ७ डिसेंबरपासून नागपुरातच होणार आहे. विधानभवनात सोमवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात विधिमंडळाचे अधिकारी समाधानी दिसून आले. नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत सकारात्मक अहवाल सादर होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, संसदीय कामकाज समिती यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल.
नागपूर करार अंतर्गत नागपुरात विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. नागपुरात मागचे अधिवेशन डिसेंबर २०१९ मध्ये झाले. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यानंतर नागपुरात कुठलेही अधिवेशन झाले नाही. सर्व अधिवेशन हे मुंबईत झालेत, ते सुद्धा कोविड नियमानुसार छोटेखानी स्वरूपात. सध्या कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता अतिशय कमी दिसून येत आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात हळूहळू सर्व निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह, स्विमिंग पूलसुद्धा सुरू होत आहेत. दिवाळीत निर्बंधांमध्ये आणखी सूट मिळण्याचे संकेतही आहेत. अशा परिस्थितीत नागपुरात अधिवेशन होण्याची शक्यता वाढली आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे.
अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल
नागपुरात हिवाळी अधिवेशनासंदर्भात सुरू असलेली तयारी समाधानकारक आहे. आमदार निवास कोविड केअर सेंटर म्हणून करण्यात आला होता. ती इमारतसुद्धा सॅनिटाईज करून अधिवेशनासाठी तयार केली जाईल. परंतु, यासंदर्भातील अंतिम निर्णय मात्र संसदीय कामकाज समितीच्या बैठकीतच घेतला जाईल.
राजेंद्र भागवत, प्रधान सचिव, विधानमंडळ