नागपूर : कैद्याला संचित रजा नाकारताना नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांनी बुद्धीचा योग्य वापर केला नाही, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी नोंदवले. तसेच, कारागृह अधीक्षकांना कडक शब्दांत फटकारले.
अमरदीप ठाकूर असे कैद्याचे नाव आहे. ठाकूरने संचित रजेसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यासाठी ९ महिने विलंब करण्यात आला. तसेच, पोलीस अहवाल ठाकूर विरोधात असल्याची बाब लक्षात घेता अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे ठाकूरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर पोलिसांचा अहवाल चुकीचा होता ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. ठाकूरला आर्थिक गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आहे. परंतु, पोलिसांनी त्याला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याची माहिती दिली. कारागृह अधीक्षकांनी पोलीस अहवालाची अचुकता तपासली नाही आणि त्या आधारावर ठाकूरला संचित रजा देण्यास नकार दिला. परिणामी, न्यायालयाने पोलीस अधीक्षकांनी अर्ज फेटाळण्यापूर्वी स्वत:चे डोके वापरणे गरजेचे होते असे सांगितले. तसेच, पोलीस अधीक्षकांनी सरकारी नोकर या नात्याने पारदर्शीपणे कार्य करणे आणि सर्व कैद्यांना समानतेची वागणूक देणे आवश्यक आहे असेही नमूद केले. ठाकूरतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.