नागपूर-अमरावतीच्या निकालाने विदर्भातील नेत्यांचे ‘स्टार’ चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 09:42 PM2023-02-10T21:42:05+5:302023-02-10T21:43:48+5:30
Nagpur News कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारकांच्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार, आमदार यशोमती ठाकूर व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना स्थान देण्यात आले आहे.
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ व अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळला. गडकरी- फडणवीस- बावनकुळेंच्या गडात भाजपचे पानिपत झाले. यामुळे विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे वजन वाढले आहे.
कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार, आमदार यशोमती ठाकूर व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना स्थान देण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ व अमरावती पदवीधर मतदारसंघ या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. नागपुरात माजी आमदार नागो गाणार, तर अमरावतीत माजी मंत्री रणजित पाटील रिंगणात होते. या जागा कायम राखण्यासाठी भाजप नेत्यांची फौज ताकदीने मैदानात उतरली होती. नागपूरच्या प्रचारात शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेदेखील येऊन गेले. भाजपला हमखास यशाची यात्रा होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी डाव उलटवला. दोन्ही जागांवर अनपेक्षित विजय मिळविला. यापूर्वी ५८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची जागा हिसकावण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक व जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळाले. या सर्व निकालांमुळे विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा पक्षांतर्गत ‘ग्राफ’ वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील नेत्यांवर विविध ठिकाणच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भातील यशाचे मार्केटिंग
- विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भात मिळालेल्या यशाचे मार्केटिंग करण्याचा काँग्रेसचा ‘प्लान’ आहे. विदर्भातील नेते कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होतील व भाजपच्या गडात कसे यश खेचून आणले, याचे समीकरण मांडतील. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ भाजपच्या ताब्यात गेला. आता तो पुन्हा काँग्रेसकडे परत येतो आहे, असे सांगून राज्यातील इतर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न विदर्भातील नेत्यांना समोर करून केला जाणार आहे.