नागपूर (कोंढाळी) : एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी दुचाकीवर ट्रीपल सीट जात असलेल्या तरुणासह महिला आणि तरुणीचा भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना कोंढाळी- नागपूर मार्गावर चाकडोह फाट्याजवळ बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. सुषमा उमेश वाघाडे (३२), प्रतीक्षा राजेंद्र वाघाडे (२२) तर रोशन नीळकंठ सहारे (२८) तिघेही रा. चमेली, ता. काटोल अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी सुषमा आणि प्रतीक्षा या रोशनची दुचाकीने (एमएच ४०, बीटी ९२२१) ट्रीपल सीट शिवा सावंगा येथील इकाॅनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत मुलाखत देण्यासाठी जात होत्या.
सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोंढाळी-नागपूर मार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली यात रोशन, सुषमा आणि प्रतीक्षा हे तिघे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस खुर्सापार मदत केंद्राचे उपनिरीक्षक नितेश भिलावे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजारगाव येथील रुग्णवाहिकेने जखमींना मेडिकलमध्ये पोहोचविले; परंतु तेथे उपचारादरम्यान सुषमा आणि प्रतीक्षाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रोशनवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. रात्री ८:३० वाजताच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. कोंढाळी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चमेली गावावर शोककळा
चाकडोह फाट्यावर घडलेल्या या अपघातात मृत्यू झालेल्या सुषमा, प्रतीक्षा व रोशन हे तिघेही कोंढाळीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चमेली गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, तिघांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे चमेली गावावर शोककळा पसरली आहे. मुलाखतीसाठी जाताना काळाने तिघांवर झडप घातल्यामुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.