लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम किरकोळी विक्रेत्यांची संघटना फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया(एफआरएआय)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीओटीपीए कायदा २०२० मधील प्रस्तावित संशोधनांना परत घेण्याची मागणी केली आहे. हे संशोधन पारित झाल्यास तंबाखू व संबंधित उत्पादने विक्रेत्यांच्या उपजीविकेवर दुष्परिणाम होण्याची भीती या मागणीसह व्यक्त करण्यात आली आहे.
या संशोधनांचा निषेध करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यात हस्तक्षेप करण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. एकट्या नागपुरात १.३५ लाख सूक्ष्म किरकोळ विक्रेते असून, त्यांच्यावर ६ लाख लोकांचे हित विसंबून आहे. हे सगळे लोक दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक, मिनरल वॉटर, सिगारेट, बिडी, पान, तंबाखू आदी उत्पादने विकून उपजीविका चालवितात. मात्र, सीओटीपीए कायद्यातील नवी प्रस्तावित संशोधने त्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारी आहेत. त्यामुळे, देशातील सर्वसामान्य किरकोळ विक्रेत्यांच्या हिताचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी फेडरेशनचे सदस्य व नागपूर पान विक्रेता संघाचे अध्यक्ष सूरज मेश्राम यांनी केली आहे. यासंदर्भात नागपुरात फेडरेशनतर्फे सोमवारी निदर्शनेही करण्यात आली होती.
.........