लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने एका व्यापाऱ्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.वर्धमाननगरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये राहणारे सुंदर कालिदास पटेल (वय ५३) यांचे स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यातून रविवारी सकाळी ७ आणि ७ वाजून ४ मिनिटांनी दोन वेळा व्यवहार करून अज्ञात आरोपीने डेबिट कार्डच्या माध्यमातून ४० हजार रुपये काढून घेतले. मोबाईलवर रक्कम काढल्याची माहिती पटेल यांना मेसेजद्वारे कळाली. त्यामुळे त्यांनी सोमवारी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक गेडाम यांनी फसवणुकीचे कलम ४२० तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत आरोपीने ही रक्कम गया (बिहार) येथील एटीएममधून दोनदा कार्ड स्वाईप करून २०-२० हजार रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. रविवार दिवस आणि सकाळची वेळ असल्याने बँकेत तातडीने तक्रार करता येणार नाही, हे जाणून आरोपीने ही बनवाबनवी केली. त्यामुळे आरोपी (सायबर ठग) आर्थिक गुन्हे करणारा सराईत असावा, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. त्याची चौकशी केली जात आहे.
डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ४० हजार काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:59 AM