अरुण महाजन
नागपूर : पैशाचा लोभ कुणालाही सुटला नाही! कमी श्रमात जास्त पैसे कमाविण्याची हल्ली काहींची मानसिकताही झाली आहे. खापरखेड्याच्या शिबा मार्केटमधील ॲक्सिस बॅंकेच्या एटीएमवर पाचशे रुपयांचा विड्रोल टाकल्यावर अडीच हजार रुपये मिळत असल्याने सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी पैसे काढण्यासाठी नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी शटर पाडून एटीएम सेंटर बंद केले.
खापरखेडा येथील शिबा मार्केटमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. सोमवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या एटीएमच्या बाजूला एस.बी.आय. आणि एच.डी.एफ.सी. बॅंकेचेही एटीएम आहे. खापरखेडा येथील काही लोकांनी ॲक्सिस बँकेच्या एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे इतर मशीनमधून पैसे काढून निघून गेले. अशातच सिल्लेवाडा येथील गोपाल पांडे हा तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात असताना कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला ५०० रुपये मागून १ हजार रुपये देतो असे सांगितले. गोपालनेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि गोपाल याला त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार गोपाल पांडेला सांगून पैसे काढून दाखविले.
यानंतर स्थानिक लोकमत प्रतिनिधीला पांडे यांनी हा डेमो करून दाखविला. लोकमत प्रतिनिधीने याबाबत खापरखेडा पोलिसांना अवगत केले. यानंतर एपीआय दीपक कांक्रेडवार यांनी पोलीस कंट्रोल रूमला याबाबतची माहिती दिली. यानंतर या एटीएमचे शटर खाली करून येथे पोलीस कर्मचारी श्याम रामटेक यांना तैनात करण्यात आले. मात्र मध्यरात्रीनंतर ही माहिती परिसरात पसरल्याने तीन वाजेपर्यंत नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी या एटीएम सेंटरकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर मोबाईलवर बॅंकेतून कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने येथे गर्दी झाली होती.
मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
मंगळवारी सकाळी कंपनीची टेक्निकल टीम येथे दाखल झाली. त्यांनी मशीनमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दूर केला. पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल. याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती टेक्निकल पथकातील प्रवीण इंदूरकर यांनी दिली.