नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील तीन महिने हैराण केल्यानंतर आता दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५०० च्या आत नोंदविली गेली. मंगळवारी ४७० रुग्ण व २५ मृत्यू झाले. परंतु सोमवारी शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कमी झालेली रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा वाढली. शहरात २१३ रुग्ण व ४ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २४६ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली.
कोरोनाचे २५ दिवसांत रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील मोठा ताण कमी झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातही आता स्थिती नियंत्रणात येत आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी चाचण्यांची संख्या वाढून १४,१४५ वर पोहोचली. यात ग्रामीणमध्ये ५,६८० तर शहरात ८,४६५ चाचण्या झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर ४.३३ टक्के तर शहरात २.५१ टक्के होता. जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, १९८१ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ७८१ तर ग्रामीण भागातील १२०० रुग्णांचा समावेश होता. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर ९५.५१ टक्के आहे. आतापर्यंत ४,५२,३४१ रुग्ण बरे झाले आहेत.
-जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू कसे रोखणार?
मागील काही दिवसांपासून शहर व ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी ११ रुग्णांचे बळी गेले व तेवढेच रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरील १५२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १३४७ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू कसे रोखणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
-मेयो, मेडिकलमधील २० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी गेले
मेयो, मेडिकलमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांमधून २० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी गेले. यात मेडिकलमधून १०,३६६ तर मेयोमधून १०,४३० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मेडिकलमध्ये ४३०, मेयोमध्ये १४० तर एम्समध्ये ८३ रुग्ण उपचार घेत आहेत.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १४,१४५
शहर : २१३ रुग्ण व ४ मृत्यू
ग्रामीण : २४६ रुग्ण व १० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७२,०११
ए. सक्रिय रुग्ण : १०,८४८
ए. बरे झालेले रुग्ण : ४,५२,३४१
ए. मृत्यू : ८,८२२