उमरेड : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच उन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक संकटकालीन आपत्तीतून बचाव होण्यासाठी प्रत्येक गावातील बसथांब्यांवर प्रवासी निवारा उभारला जातो. एकीकडे बऱ्याच वर्षांपासून प्रवासी निवारे अजूनही शाबूत आहेत तर दुसरीकडे नव्यानेच उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याचा काही महिन्यातच ‘बोजवारा’ उडाल्याने या प्रवासी निवाऱ्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्न विचारले जात आहेत. उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्यावर प्रवासी निवाऱ्याची दयनिय अवस्था झाली आहे.
उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अशावेळी उमरेड ते मालेवाडा या १८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत सुमारे १५ प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. स्टेनलेस स्टिल आणि लोखंडी जाळीचा वापर करीत या प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम ठिकठिकाणी पूर्णत्त्वास आले. अशातच काही महिने उलटत नाही तोच वाहनाच्या एका धडकेत प्रवासी निवारा मोडकडीस आल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकनजीक असलेल्या स्मारक समितीच्या कार्यालयालगत असलेल्या प्रवासी निवाऱ्याची झालेली ही अवस्था निवाऱ्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. काही गावांना प्रवासी निवारा उभारण्यात आला नाही. वगळण्यात आले, असा आरोपही होत असून, या कामाच्या संपूर्ण गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.