लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय प्रशासनिक सेवा अर्थात संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) अनेक परीक्षार्थीसाठी एखादे हिमनग गाठण्यासारखे आहे. यात कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय यश प्राप्त करणे अतिशय कठीण असल्याचे बोलले जाते. मात्र नागपूरच्या समीर खोडे या तरुणाने हा भ्रम दूर केला. समीरने कुठलेही कोचिंग न करता स्वत:च्या परिश्रमाने यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले.समीर खोडे यांनी अखिल भारतीय स्तरावर ५५१ वी रॅँक प्राप्त करीत यश मिळविले. विशेष म्हणजे त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात ही यशस्वी कामगिरी केली. अयोध्यानगर येथील रहिवासी समीर शालेय शिक्षणापासूनच हुशार. २००४ साली पं. बच्छराज व्यास शाळेतून दहावी केलेल्या समीर याने राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत २४ वे स्थान प्राप्त केले होते. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून बारावी करताना २००६ साली गुणवत्ता यादीत १२ वे स्थान प्राप्त केले होते. यानंतर व्हीएनआयटी मधून बी.टेक. विषयात पदवी प्राप्त केली. आयआयएममध्ये त्याने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यानंतर अमेरिकेतील एका कंपनीत जॉब सुरू केला.