निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाश्चात्य देशातील विज्ञानाशी तुलना करताना पुराणातील गोष्टींचा उल्लेख करीत आमच्याकडील विज्ञान किती तरी प्रगत होते, असा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र विज्ञान हे सिद्धतेचे प्रमाण मागत असते. पुराणातील या गोष्टींच्या सिद्धतेचा पुरावा काय, असा सवाल ज्येष्ठ गणितज्ज्ञ व खगोल भौतिकशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केला आहे. माधवाचार्य यांनी गणित आणि विज्ञानाची सूत्रे (कॅल्कुलस) मांडली होती व त्याला ठोस पुराव्याचा आधार आहे. पुराणातील गोष्टींना ठोस पुराव्याचा आधार मिळाल्याशिवाय ते विज्ञान मानता येणार नाही, असे स्पष्ट मत डॉ. चित्रे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या कार्यक्रमात आलेल्या डॉ. शशिकुमार चित्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेकडो वर्षांच्या आधीपासून मानवाला अंतराळाचे कुतूहल आहे, तसे पक्ष्यांप्रमाणे उडण्याचेही आकर्षण राहिले आहे. पण याचा उल्लेख करून विमानाच्या संशोधनाची माहिती होती, असे म्हणता येत नाही, असे ठाम मत त्यांनी मांडले. माधवाचार्य यांनी गणितीय ‘क्वॉड्राडिक इक्वेशन’ मांडल्याचा पुराव्यासकट आधार आहे व त्यास मान्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘बिग बँग थियरी’प्रमाणे विशाल स्फोट घडवून आणल्यानंतर पहिल्या तीन मिनिटात हेलियम, लिथियम, बेरिलियम आदी धातूंची निर्मिती झाल्याचे आढळून आले होते. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेच्या वेळीही अशा धातूंची अस्तित्वाची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे मानले जाते. यावरून विशाल स्फोटातून विश्वाची निर्मिती झाली, या दाव्याला ठोस आधार प्राप्त झाल्याचे मत डॉ. चित्रे यांनी व्यक्त केले. स्टीफन हॉकिंग यांच्या ‘ब्लॅक होल’चा दावा अद्यापपर्यंत सिद्ध होऊ शकला नाही, मात्र त्यांच्या थियरीमुळे अंतराळ संशोधनाला नवे आयाम प्राप्त झाल्याचे डॉ. चित्रे म्हणाले. दरम्यान, ब्लॅक होलसारखी गोष्ट प्रयोगशाळेत तयार केली जाऊ शकते, असा दावाही त्यांनी केला. जगभरातील संशोधकांनी गेल्या २० वर्षांत २००० कोटी ताऱ्यांचा शोध लावल्याचा दावा करीत, आपण ज्या विश्वात राहतो त्याप्रमाणे अंतराळात सूर्यासारखे अनेक तारे आणि शेकडो ब्रह्मांड असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.डेटा अॅनालिसिससाठी सक्षम मनुष्यबळाचा अभावखगोलशास्त्राकडून भरपूर प्रमाणात इंटेलिजन्स डेटा सतत प्राप्त होत आहे. मात्र हा डेटा संशोधित (अॅनालिसिस) करायला सक्षम मनुष्यबळाचा अभाव असल्याचे डॉ. चित्रे यांनी सांगितले. संगणक तंत्रज्ञान, फायनान्स किंवा इतर विषयाप्रमाणे खगोल भौतिकशास्त्राचे ग्लॅमर (आकर्षण) विद्यार्थ्यांमध्ये नाही. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे अंतराळातून मोठ्या प्रमाणात डेटा येत असला तरी त्याचे डिकोडिंग करणे अशक्य आहे. सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पाईपलाईन आखणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.तेव्हा हॉकिंग्स यांना पायावर उभे पाहिलेमहान भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्स यांच्या आठवणींना डॉ. चित्रे यांनी उजाळा दिला. पीएचडीसाठी अमेरिकेत वास्तव्यास असताना माझ्या दोन वर्षानंतर स्टिफन हॉकिंग्स तेथे आले होते व ते माझ्या शेजारीच राहत होते. त्यावेळी पहिल्यांदा त्यांना पायावर उभे राहिल्याचे पाहिले. त्यानंतर मात्र ते कायमचे व्हीलचेअरला खिळले. संशोधन पूर्ण झाल्यानंतर निरोप घेणाऱ्यांपैकी ते सर्वात शेवटचे व्यक्ती होते. डॉक्टरांनी ते केवळ दोन वर्ष जगतील, असे संकेत दिले होते. मात्र त्यांच्या इच्छाशक्तीने दुर्धर आजारावर मात केली. ते अतिशय प्रज्ञावंत होते व शरीर जसजसे कमजोर झाले तशी त्यांची बुद्धिमत्ता वाढत गेल्याची भावना डॉ. चित्रे यांनी व्यक्त केली.