नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) शहरच्यावतीने मागील आठवड्यात पाणीपुरवठा करणारे १२ टँकर जप्त केले होते. यातील सर्वच टँकरकडे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) व परमीट नव्हते. आरटीओनुसार, शहरात महापालिकेने कंत्राट दिलेले ७५ टक्के टँकर फिटनेसविना रस्त्यावर धावत आहेत. यांच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. टँकरमुळे होणाºया अपघाताला जबाबदार कोण, महापालिका की टँकरचालक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणाºयांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात कडक सुधारणा केली. वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाºयांना जबर दंड आणि शिक्षेची तरतूदही केली. या नव्या सुधारित नियमांमुळे बेशिस्त वाहन चालकांना कायद्याच्या बडग्याला तोंड देताना फेस येईल, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु खुद्द महापालिका प्रशासन टँकरचे कंत्राट देताना आवश्यक बाबी तपासत नसल्याचे सत्य उजेडात आले आहे. यामुळे शहराच्या गल्लीबोळात पाणीपुरवठा करणाºया टँकरचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. आरटीओने नुकतेच यावर वचक बसविण्यासाठी टँकरवर कारवाई केली. १२ टँकर पकडले. यातील एकाही टँकरकडे फिटनेस किंवा परमीट नव्हते. यातच या सर्वच वाहनाच्या पाण्याच्या टाक्या फुटलेल्या होत्या. रस्त्यावर पाणी सांडवत रहदारी करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच होते. म्हणूनच या सर्व टँकरला जप्त केले. परंतु त्यानंतरही महापालिकेने टँकरच्या आवश्यक बाबी तपासल्या नाहीत. शहरात दरवर्षी टँकरमुळे अपघात होतात. अनेकांचे जीव जातात. परंतु महापालिका कंत्राट देताना वाहनाचे परमीट किंवा फिटनेस सर्टिफिकेटही पाहत नाही. (प्रतिनिधी)
फिटनेस सर्टिफिकेट न घेताच रस्त्यावर : महापालिकाही उदासीन
By admin | Published: May 05, 2014 1:42 AM