मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ भारत मिशन’चे आधारस्तंभ असणारे स्वच्छता कामगार शहरात ग्लोव्हज व मास्क या सुरक्षा साधनाविना कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संसर्गाची लागण झाली आहे. महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनला गालबोट लावणारा हा प्रकार आहे. त्यासाठी जबाबदार कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीला यावर जाब विचारणे आवश्यक झाले आहे.धरमपेठ झोनमध्ये कचरा गोळा करणाऱ्या एका कामगारानुसार, त्यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी ग्लोव्हज व मास्क देण्यात आले होते. त्यानंतर या सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले नाही तसेच कामगारांना स्वच्छता खर्चही दिला जात नाही. दुसऱ्या कामगाराने वेगळाच मुद्दा मांडला. कामगारांना प्रशिक्षण दिले गेले नसल्यामुळे ते ग्लोव्हज व मास्क घालून काम करू शकत नाही. कचरा गोळा करण्याचे काम आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे असतानाही कामगारांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जात नाही.अन्य एका स्वच्छता कामगाराने कचरा गोळा करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. नागरिक सुका व ओला कचरा वेगळा करीत नाहीत. हे काम कामगारांनाच करावे लागते. दरम्यान, त्यांचा नको त्या वस्तूंनाही स्पर्श होतो. अनेकदा काचाचे तुकडे व अन्य धारदार वस्तूंमुळे कामगारांचे हात कापले जातात. कंपनीच्या ग्लोव्हजमुळे त्यांचा बचाव होत नाही, असे त्यांनी सांगितले.
आरोप चुकीचेकनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीने स्वच्छता कामगारांना सर्व प्रकारची सुरक्षा साधने पुरविली आहेत. ग्लोव्हज गेल्यावर्षीच देण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांचे सर्व आरोप चुकीचे आहेत.- कमलेश शर्मा, प्रकल्प प्रमुख.
काय म्हणतात डॉक्टर...डॉ. पिनाक दंदे यांनी स्वच्छता कामगारांना होणाऱ्या आजारांची माहिती दिली. मोकळ्या हाताने कचरा हाताळल्यास विविध प्रकारच्या संसर्गाची लागण होते. तसेच, टीबी, हिपेटायटिस, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, डायरिया, निमोनिया इत्यादी गंभीर आजार जडतात. परिणामी, स्वच्छता कामगारांची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी व त्यांच्यावर आवश्यक सुरक्षात्मक उपचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.