राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात सात ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करीत शेतकऱ्यांकडील धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी केली. या सर्व खरेदी केंद्रांवर नाेंदणीकृत दाेन हजार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली असून, १,१०० शेतकऱ्यांकडील धान अजूनही विक्रीविना आहे. शासनाने धान खरेदीची अंतीम मुदत ३१ मार्च जाहीर केली हाेती. या खरेदी केंद्रांवर धानाच्या माेजमापाचा वेग सुरुवातीपासून संथ हाेता. त्यातच मध्यंतरी खरेदी केंद्राही २२ ते २५ दिवस बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान विकायचा कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करणे सक्तीचे केले असताना त्यांचे संकेतस्थळ बराच काळ बंद हाेते. असे असतानाही शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. या केंद्रांवर धान माेजणीचा वेगही संथ ठेवण्यात आला हाेता. त्यातच केंद्रावरील गाेदामांमधील धानाची तातडीने उचल न केल्याने गाेदामे फुल झाली आणि बराच काळ खरेदी बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे धान खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित असताना सरकारने ती नाकारल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली.
रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाच्या भोंदेवाडा(डोंगरी), हिवराबाजार, भंडारबोडी (महादुला), पवनी, देवलापार (बांद्रा) व टुयापार या सहा खरेदी केंद्रांना एकूण १३० गावे जाेडण्यात आली हाेती. काही दिवसांपूर्वी या खरेदी केंद्रांवर ८५८ शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली असून, नंतर त्यात थाेडी वाढ झाली. महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने रामटेक तालुका शेतकी खरेदी- विक्री संस्थेच्या खरेदी केंद्रावर दाेन हजार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली. एका खरेदी केंद्रावर दाेन हजार तर सहा खरेदी केंद्रांवर केवळ एक हजार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी विचारात घेता माेजमापाचा वेग आणि अनास्था लक्षात येते.
....
‘खविसं’कडे ३,२३७ शेतकऱ्यांची नाेंदणी
आदिवासी विकास महामंडळाचे ढिसाळ व्यवस्थापन व खरेदी केंद्रांवरील धान खरेदीचा संथपणा लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यासह खरेदी- विक्री संस्थेकडे नाेंदणी केली. त्यामुळे खरेदी विक्री संस्थेकडे नाेंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या ३,२३७ वर पाेहाेचली. त्यांनी ३१ मार्चपर्यंत यातील दाेन हजार शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप केले. शासनाने मुदतवाढ न दिल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे १,१०० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करणे शिल्लक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
...
चुकारे व बाेनस रखडला
शासनाने धान खरेदी बंद केल्याने तसेच मुदतवाढ न दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील धान व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आदिवासी विकास महामंडळाच्या अनास्थेमुळे निर्माण झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. रामटेक येथील सहायक निबंधक रवींद्र वसू आजारी असल्याने ते याबाबत माहिती देऊ शकले नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
आदिवासी महामंडळाने तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या धानाचे चुकारे आणि बाेनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली नाही, अशी माहिती महादुला येथील शेतकरी साेमा डडुरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिली. चुकारे तातडीने बँक खात्यात जमा करून धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.