लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावीरनगरातील सैतवाळ जैन संघटन मंडळ युवा शाखेतर्फे पर्युषण पर्वानिमित्त ‘समाजकारण व राजकारण’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभिनंदन पळसापुरे हे उपस्थित होते. याशिवाय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड, करिअर मोटिव्हेटर डॉ. नरेन्द्र भुसारी, अखिल दिगंबर सैतवाळ संस्थेचे विदर्भ विभागीय सचिव राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर उपस्थित होते.राजकारण व समाजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीची सुरुवात समाजसेवेपासून होते तर शेवट राजकारणाने होतो. समाजसेवेत कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो, तो कधीच माजी कार्यकर्ता होत नाही. समाजसेवेची आवड लहानपणापासून असली पाहिजे. आपण समाजाचे पुढारी, पदाधिकारी बनलो व त्यानंतर पन्नास-शंभर कार्यकर्ते मिळाले तेव्हा त्याच्या मनात येते मी समाजाचा पुढारी झालो, आता कार्यकर्त्यांनी माझे ऐकले पाहिजे. या विचारापासून समाजात राजकारणाची सुरुवात सध्या होते आहे. आता समाजात माझी चलती राहील. आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले. जोपर्यंत सामाजिक संघटन मजबूत नसेल तोपर्यंत राजकारणावर कोणताही फरक पडणार नाही. समाजाने आपला पुढारी निवडल्यावर त्याला संघटित होऊन पूर्ण सहकार्य केले तर तो राजकारणात प्रभावी कार्य करू शकतो. सामाजिक संघटनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अभिनंदन पळसापुरे यांनी केले. डॉ. नरेन्द्र भुसारी, राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन नीरज पळसापुरे यांनी तर सिद्धांत नखाते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सैतवाळ जैन संघटन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे, प्रकाश मारवडकर, सुभाष मचाले, विनय बंड, प्रशांत सवाने, श्रीकांत मानेकर, विशाल चानेकर, रमेश तुपकर, शरद वेखंडे, धीरज बंड, संयम भुसारी, निखील पळसापुरे, अभिषेक बंड, चैतन्य महाजन उपस्थित होते.
सामाजिक संघटनेशिवाय राजकारण अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:47 PM