शिक्षण समिती सभापती पाटील : आदिवासी भागातील शाळांची केली पाहणी
देवलापार : विद्यार्थी व शिक्षकांशिवाय शाळा भरू शकत नाही. आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा लॅपटॉप घेणे शक्य नाही. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती भारती पाटील यांनी केले. लॉकडाऊननंतर आदिवासी भागातील शाळांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाटील यांनी बुधवारी बोथिया पालोरा व वडांबा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधांबाबत चौकशी करीत आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची हमी दिली. यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यासाठी जि.प.च्या शेष फंडातून व्यवस्था करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी रामटेक पंचायत समितीच्या सभापती कला ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य कैलास राऊत, वडांबाच्या सरपंच वीण ढोरे, रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह यादव, उपसभापती रवींद्र कुमरे, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पिल्लारे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय थूल यांनी तर आभार शारदा कोडापे यांनी मानले. यावेळी डॉ. यमुना नाखले, निशिगंधा नागदेव, स्वाती गांगुली, रूपाली कोचे, विशाल लाडसे, वीरेंद्र चिखलोंढे उपस्थित होते.