नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आलेल्या ओळख परेडमध्ये साक्षीदार सुरेंद्र टेकाडे याने दोन्ही आरोपींना ओळखले होते, अशी साक्ष नायब तहसीलदार मोहन टिकले यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिली. आपली सर तपासणी साक्ष देताना टिकले म्हणाले की, आपण ही ओळख परेड २५ सप्टेंबर २०१४ रोजी घेतली होती. आठ व्यक्ती उभ्या असलेल्या दोन रांगा तयार केल्या होत्या. एका रांगेत आरोपी राजेश दवारे तर दुसऱ्या रांगेत आरोपी अरविंद सिंग याला उभे ठेवले होते. साक्षीदार सुरेंद्र टेकाडे याने आधी पहिल्या रांगेतील आरोपींना निरखून पाहून राजेश दवारे याला ओळखले. घटनेच्या दिवशी दवारे हा मोटरसायकल चालवीत होता, असे त्याने सांगितले. त्यानंतर दुसऱ्या रांगेतील आरोपींना निरखून त्याने अरविंद सिंगला याला ओळखले. घटनेच्या दिवशी अरविंद सिंग हा मोटरसायकलच्या मागे बसलेला होता. राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांच्या मध्ये मोटरसायकलवर एक लहान मुलगा होता, असे त्याने सांगितल्याचे टिकले यांनी आपल्या साक्षीत सांगितले. टिकले यांची ही साक्ष अर्धवट राहिली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी मुकेश चांडक यांचे वकील अॅड. राजेंद्र डागा, अॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींचे वकील अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. प्रमोद उपाध्याय आणि अॅड. राजश्री वासनिक काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)
ओळख परेडमध्ये साक्षीदाराने आरोपींना ओळखले
By admin | Published: May 08, 2015 2:13 AM