नागपूर : संदीप प्रसन्नकुमार मिश्रा, रा. खाेब्रागडे नगर, पंचशील नगर, नागपूर आणि जयवंता टीकाराम भगत (५०, रा. पूर्वाटाेला, ता. लांजी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) या दाेघांच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या ३६ तासात आराेपी महिलेस अटक केली. संदीपचा मृतदेह रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला शिवारात तर जयवंताचा मृतदेह करडी (मध्य प्रदेश) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील देवारा शिवारात आढळून आला हाेता.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये महेश भैयालाल नागपुरे (४१, रा. सिद्धीटाेला, ता. सालेकसा, जिल्हा गाेंदिया) याच्यासह एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणात दाेन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. आराेपी महिली ही ३२ वर्षाची असून, ती मरकाखानदा, ता. सालेकसा, जिल्हा गाेंदिया येथील रहिवासी असून, ती जयवंताच्या भावाची मुलगी म्हणजेच तिची भाची हाेय.
महादुला शिवारात मंगळवारी (दि. १८) अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ताे अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांच्या माहुली शिवारातील शेतात काम करणारा असल्याचे स्पष्ट हाेताच त्याची ओळख पटली. त्याच्यासाेबत राहणारी जयवंताही याच काळापासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने संदीपच्या खुनासाेबतच जयवंताचाही शाेध सुरू केला. त्यातच करडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत तिचाही मृतदेह आढळून आल्याने हा दुहेरी हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले.
दाेन्ही आराेपी प्रियकर प्रेयसी असून, महेश दाेन अल्पवयीन मुलांना घेऊन त्याच्या सीजी-०४/केझेड-२७११ क्रमांकाच्या वाहनाने लांजीहून माहुलीला आला हाेता. त्या तिघांनी रविवारी (दि. १६) रात्री संदीप व जयवंंताला बेदम मारहाण केली. संदीपला वाहनात टाकून महादुला शिवारात नेले. तिथे कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला व मृतदेह राेडलगतच्या खड्ड्यात फेकून दिला. त्यानंतर त्याने जयवंताचा कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला आणि मृतदेह देवारा शिवारात फेकला. या प्रकरणात चाैघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना रामटेक पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
आराेपी महिला जयवंताकडे राहायची
आराेपी महिला विवाहित असून, ती सात महिन्यांपूर्वी पतीला साेडून तिचा प्रियकर महेश भैयालाल नागपुरे याच्यासाेबत पळून जयवंताकडे आली हाेती. तिच्यासाेबत तिची दाेन मुलेदेखील हाेती. जयवंता ही तिची आत्या हाेय. ती व महेश जयवंतासाेबत राहायची व मजुरी करून उदरनिर्वाह करायची.
अनैतिक संबंधातून भांडण
संदीप व जयवंता दाेघेही अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांच्या माहुली शिवारातील शेतात असलेल्या घरी एकत्र राहायचे. त्यातच या दाेघांनी आराेपी महिला व महेशच्या अनैतिक संबंधाबाबत तिचा पती धनराज याला फाेनवरून माहिती दिली हाेती. याच कारणावरून आराेपी महिला व जयवंताचे घटनेच्या आठ दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यानंतर दाेघांनीही संदीप व जयवंताचा खून करण्याची याेजना आखली.