नागपूर : वाहतूक पोलिसांच्या चालानपासून वाचण्यासाठी अचानक वळल्याने महिलेला किरकोळ अपघात झाला. ती मुलीला घेऊन मेयोमध्ये उपचारासाठी निघाली होती. यानंंतर पोलिसांनी वाहन चालान करण्याचा प्रयत्न केल्यावर महिला प्रचंड संतप्त झाली. प्रचंड गोंधळ घालून स्वत:ला पेट्रोलने जाळून घेण्याची धमकी दिली. इतवारीच्या शहीद चौकातील या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ही महिला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मुलीला घेऊन दुचाकीने निघाली होती. चौकातील पोलिसांनी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. हे पाहून लगतच्या गल्लीकडे वळण्याच्या प्रयत्नात ती पडली. पोलीस जवळ धावत आल्याचे पाहून ती संतप्त झाली.
मुलीला मारायला लागली. पोलिसांच्या कारवाईमुळे आपण जखमी झाल्याचा महिलेचा आरोप होता. पोलिसांनी वाहन चालान करण्याची कारवाई सुरू केली असता, यापूर्वीचाही चालान भरला नसल्याचे लक्षात आले. यामुळे पोलिसांनी वाहन डिटेन करण्याची धमकी दिली. यामुळे महिला प्रचंड संतापली. वाहनातून पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करून स्वत:ला जाळून घेण्याची धमकी दिली. मी मुलीला उपचारासाठी मेयोमध्ये नेत होते. मात्र पोलिसांनी विनाकारण त्रास दिल्याचा या महिलेचा आरोप होता. ती ऐकत नाही हे पाहून पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांचे पथक बोलावले. ठाण्यात चालण्याचे फर्मावल्यावर ती अधिकच संतप्त झाली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. शासकीय कामात अडथळा घातल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.
...
वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर रोष
नागरिकांचा वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर रोष आहे. पोलीस अचानक पुढे येऊन वाहन थांबविण्याचा प्रयत्न करतात. वाहनाचे हॅन्डल किंवा हात पकडतात. अशा वेळी ठोस लागू नये म्हणून स्वत:चा तोल सांभाळताना वाहनचालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटते व अपघात घडतो. अशा अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. मात्र वाहतूक पोलीस अधिकारी यावर काहीच कारवाई करण्याच्या मानसिकतेत नाहीत.
...